काँग्रेसच्या बळकटीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:36 AM2020-12-30T04:36:30+5:302020-12-30T04:36:30+5:30
०३ : सांगलीतील काँग्रेस भवनात सोमवारी काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त पार पडलेल्या कार्यक्रमात जयश्रीताई पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विशाल ...
०३ : सांगलीतील काँग्रेस भवनात सोमवारी काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त पार पडलेल्या कार्यक्रमात जयश्रीताई पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विशाल पाटील, डॉ. नामदेव कस्तुरे उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : स्वातंत्र्यातील काँग्रेसचे योगदान मोठे आहे. देशहित जपणाऱ्या या पक्षाला बळकटी देण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कष्ट करावेत, असे आवाहन काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांनी केले.
येथील काँग्रेस भवनात सोमवारी पक्षाचा स्थापना दिन साजरा झाला. सुरुवातीला पक्षीय ध्वजास मानवंदना देण्यात आली. जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील उपस्थित होते. यावेळी डॉ. नामदेव कस्तुरे यांनी काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनापासून आजपर्यंतच्या पक्षीय वाटचाल व कार्याची माहिती दिली.
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जयश्रीताई पाटील म्हणाल्या की, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे मोठे योगदान आहे. महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीवजी गांधी यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून त्यांच्या कार्याची प्रेरणा सर्वांनी घ्यावी. जिल्ह्यातील तळागाळापर्यंत काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी काम करावे.
विशाल पाटील म्हणाले की, काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांच्या हितसाठी काम करणारा पक्ष आहे. काँग्रेसची विचारधारा ही नेहमीच देशहिताची राहिली आहे. यापुढील काळात जिल्ह्यामध्ये आम्ही सर्व नेतेमंडळी पक्ष बळकट करण्यासाठी अधिकाधिक काम करू.
अमित पारेकर यांनी प्रास्ताविक, तर अरुण पळसुले यांनी स्वागत केले. पैगंबर शेख यांनी आभार मानले. यावेळी अजित शिरगावकर, आण्णाप्पा कोरे, सचिन चव्हाण, नंदकुमार शेळके, संतोष पाटील, बेबीनंदा चिगटेरी, संभाजी पाटील, श्रीनाथ देवकर, नामदेव पटाडे, सुभाष खोत उपस्थित होते.
चौकट
सेल्फी वुईथ तिरंगा
काँग्रेस स्थापना दिनानिमित्त सेल्फी वुईथ तिरंगा ही मोहीम राबविण्यात आली. नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तिरंग्यासह सेल्फी घेऊन या मोहिमेत सहभाग घेतला.