पोलीस करतात सांभाळ लोकसभा, विधानसभेची इव्हीएमचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 12:21 AM2020-02-09T00:21:18+5:302020-02-09T00:23:36+5:30
सध्या सांगलीतील यंत्रे तरुण भारत व्यायाम मंडळाच्या इमारतीत आहेत. इमारतीचा एक भाग प्रशासनाच्या ताब्यात असल्याने मंडळाचे क्रीडाविषयक उपक्रम खोळंबले आहेत. इमारत रिकामी करून देण्याची विनंती मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
सांगली : लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांनंतर काही महिने लोटले तरी, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स अद्याप जिल्ह्यातच आहेत. सांगली-मिरजेसह सर्व तालुक्यांतील शासकीय इमारतींत बंदोबस्तात ठेवली आहेत. पोलीस यंत्रणा त्यांची अहोरात्र निगराणी करत आहे.
लोकसभेच्या निवडणुका एप्रिल-मेमध्ये व विधानसभेच्या अॉक्टोबरमध्ये झाल्या. निकाल इव्हीएममध्ये बंदिस्त झाले. लोकसभेची सुमारे १ हजार ८४८ यंत्रे मिरजेतील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात बंदिस्त आहेत.
विधानसभेची यंत्रे त्या-त्या मतदारसंघांत ठेवली आहेत. मिरजेत वैरण बाजारातील गोदामात ३२६ यंत्रे बंदिस्त आहेत. सांगलीची ३१० यंत्रे तरुण भारत व्यायाम मंडळाच्या इमारतीत आहेत. जतची २८३, पलूस-कडेगावची २८४, खानापूर-आटपाडीची ३४८, तासगाव -कवठेमहांकाळची २९७, शिराळ््याची ३३४ व इस्लामपूरची २८४ यंत्रे बंदोबस्तात आहेत. एक हवालदार व तीन शिपाई असा पोलीस बंदोबस्त आहोरात्र आहे.
जिल्हाभरात विखुरलेली ईव्हीएम एकत्रित ठेवण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे, जेणेकरुन त्यामध्ये सुसंगती येईल व बंदोबस्ताचा ताणही कमी होईल. सध्या सांगलीतील यंत्रे तरुण भारत व्यायाम मंडळाच्या इमारतीत आहेत. इमारतीचा एक भाग प्रशासनाच्या ताब्यात असल्याने मंडळाचे क्रीडाविषयक उपक्रम खोळंबले आहेत. इमारत रिकामी करून देण्याची विनंती मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
...म्हणून इव्हीएम सांभाळून ठेवतात
मतमोजणीनंतर सहा महिन्यांपर्यंत ती सांभाळून ठेवण्याचा निवडणूक आयोगाचा नियम आहे. लोकसभा मतमोजणीला सहा महिने लोटले; पण देशात अन्यत्र निवडणुका नसल्याने यंत्रांना मागणी आली नाही. विधानसभा मतमोजणीला सहा महिने व्हायचे असल्याने यंत्रे येथेच ठेवली आहेत. एखाद्या मतदारसंघातील मतमोजणीविरोधात कायदेशीर पेच निर्माण झाल्यास यंत्रे व त्यातील तपशील महत्त्वाचा ठरतो. मिरजेतील निकालानंतर उमेदवाराच्या पात्रतेविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली गेली, त्यामुळे तेथे इव्हीएम सांभाळून ठेवणे महत्त्वाचे ठरले.
जिल्ह्यातील सर्व यंत्रे एकत्रित ठेवण्यासाठी मालगाव हद्दीतील केंद्रीय वखार महामंडळाचे गोदाम आम्हाला मिळाले आहे. तेथे दुरुस्तीची मोठी कामे करावी लागतील. दुरुस्तीनंतर सर्व यंत्रे पंढरपूर रस्त्यावरील या गोदामात ठेवली जातील’.
- डॉ. स्वाती देशमुख-पाटील
निवडणूक उपजिल्हाधिकारी, सांगली