माजी सैनिकांच्या अस्मितेने साताऱ्यात फुलले निखारे..
By admin | Published: February 27, 2017 11:25 PM2017-02-27T23:25:57+5:302017-02-27T23:25:57+5:30
परिचारकांच्या प्रतिमेला काळे : राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
सातारा : भारतीय सैन्य आणि त्यांच्या परिवाराविषयी आमदार प्रशांत परिचारक यांनी काढलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ साताऱ्यातील माजी सैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला. यावेळी निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. परिचारक यांना निलंबित करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
सातारा जिल्हा हा आजी-माजी सैनिकांचा जिल्हा म्हणून राज्यभर ओळखला जातो. त्यामुळे राज्यभरातील सर्व आजी-माजी सैनिक व त्यांच्या परिवारातर्फे शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘पंढरपूर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून विधान परिषदेवरील भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांनी भोसे येथील सभेत सीमेवरील सैनिक व त्यांच्या पत्नी व मुलांविषयी संतापजनक अश्लील विधान केले आहे. यामुळे भारतीय सैन्यांबरोबरच संपूर्ण भारतीय स्त्रियांचा अवमान केला आहे. हा अवमान भारतीय लष्कर व त्यांच्या राष्ट्रभक्तीचा आहे. हा अवमान संपूर्ण देशाच्या प्रतिष्ठेचा व प्रतिमेचा आहे.
देशातील नागरिकांना अमर्याद स्वातंत्र उपभोगता यावे, यासाठी घर संसार, कुटुंब सोडून देश रक्षणार्थ अहोरात्र पहारा देऊन प्रसंगी प्राणांची आहुती देतात. त्या जवानांच्या मानसिकतेचे परिचारक यांनी केलेल्या अभद्र वक्तव्याने मोठे हनन झाले आहे. सीमेवरील सैनिकास समोर शत्रू दिसत असतानाही गोळी चालविण्यासाठी आदेशाची वाट पाहावी लागते. पण उलट अशा गलिच्छ राजकारणी लोकप्रतिनिधींना या देशाने दिलेल्या भाषण स्वातंत्र्याची अवहेलना होत आहे, हे आता सिद्ध झाले आहे,’ असेही पत्रकात म्हटले आहे.
‘या विधानामुळे भारतविरोधी शक्तींना त्यापासून बळ मिळणार आहे. दुसरीकडे सैन्यांचे मनोबल खचणार आहे. यामुळे देशाची मोठी हानी होऊ शकते. आमदार परिचारक यांना निलंबित करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राज्यातील आजी माजी सैनिक संघटना व सामाजिक संघटनांची असणार आहे.’ असेही पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)
माफी नको राजीनामा हवा
‘आक्षेपार्ह विधानाची चित्रफीत सोशल मीडियावर पसरत आहे. त्यामुळे देशाबरोबरच देशाबाहेरही अपप्रचार होऊ शकतो. शिवाय सैनिक व त्यांच्या परिवाराचे मनोबल कायमचे खचणार आहे. परिचारक यांनी लेटरपॅडवर मागितलेली माफी दिशाभूल करणारी आहे. ती पुरेसी नसून राजीनामा देणे गरजेचे आहे,’ अशीही मागणी करण्यात आली.