बेकायदेशीर पिस्तूलसह माजी सैनिकास अटक, सांगलीतील विटा पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 12:37 PM2023-02-09T12:37:35+5:302023-02-09T12:38:03+5:30
आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून ५० हजार रुपये किमतीच्या पिस्तुलासह ५५ हजार ३०० रुपये किमतीचे १६ राऊंड, दोन मॅग्झीन जप्त
विटा : विनापरवाना पिस्तूल बाळगल्याप्रकरणी प्रभाकर तुकाराम जाधव (वय ५३, रा. घोटी बुद्रुक, ता. खानापूर) येथील माजी सैनिकास विटा पोलिसांनी बुधवारी दुपारी अडीच वाजता अटक केली. पोलिसांनी त्याच्याविराेधात आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून ५० हजार रुपये किमतीच्या पिस्तुलासह ५५ हजार ३०० रुपये किमतीचे १६ राऊंड, दोन मॅग्झीन जप्त केले.
घोटी बुद्रुक येथील माजी सैनिक प्रभाकर जाधव हे विनापरवाना पिस्तूल कमरेला बाळगून फिरत असल्याची माहिती विटा पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या खानापूर पोलिस दूरक्षेत्राचे उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांना मिळाली. त्यांनी उपअधीक्षक पद्मा कदम आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी दुपारी घोटी बुद्रुक बसस्थानक परिसरात सापळा लावला. माजी सैनिक जाधव हा त्याठिकाणी आल्यानंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन तपासणी केली.
त्यावेळी त्याच्या कमरेला ५० हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल मॅग्झीनसह मिळाले तसेच पॅंटच्या खिशात ४ हजार ८०० रुपये किमतीचे १६ जिवंत राऊंड व ५०० रुपये किमतीचे एक काळ्या रंगाचे मॅग्झीन असा सुमारे ५५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल मिळाला.
पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्याजवळील पिस्तूलसह मुद्देमाल जप्त केला. त्याच्याविराेधात विटा पोलिस ठाण्यामध्ये विनापरवाना पिस्तूल बाळगल्याप्रकरणी आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्यासह हवालदार रवींद्र धादवड, प्रदीप पाटील, महावीर कांबळे, शिवाजी हुबाले, संतोष घाडगे, सुहास खुबीकर, महेश खिलारी, सुधाकर पाटील, लक्ष्मण गुरव यांनी केली.