माजी सैनिक होणार आता शाळांमध्ये क्रीडा शिक्षक, पदवीधारकांवर बेरोजगारीची टांगती तलवार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 01:44 PM2023-03-28T13:44:52+5:302023-03-28T13:45:17+5:30
शासनाकडून शिक्षण विभागास पत्र देऊन याबाबतचा प्रस्ताव मागविण्यात आला
प्रताप महाडिक
कडेगाव : माजी सैनिकांना क्रीडा शिक्षक म्हणून सेवेत समावून घेण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर हालचाली सुरू आहेत. पाच शाळांसाठी एक क्रीडा शिक्षकपद निर्माण करण्यात येणार आहे. दि. २३ मार्च रोजी शासनाकडून शिक्षण विभागास पत्र देऊन याबाबतचा प्रस्ताव मागविण्यात आला आहे. यामुळे माजी राष्ट्रीय खेळाडू, बीपीएड, एमपीएड व एनआयएस पदवी प्राप्त करून क्रीडा शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
माजी सैनिकांचे देशाच्या सुरक्षेसाठीचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. मात्र बीपीएड पदवी व एमपीएड पदव्युत्तर पदवी घेतलेले तसेच वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात राज्य, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धात सहभागी झालेले व प्रशिक्षित क्रीडा मार्गदर्शक असलेले हजारो तरुण सध्या बेरोजगार आहेत.
सैनिक फेडरेशन व सैनिक समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य व शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची शालेय शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ११ नोव्हेंबर २०२२ रोजी एक सभा घेतली. यात माजी सैनिकांना शिक्षक म्हणून सेवेत सामावून घेण्याच्या दृष्टीने ८ ते १० शाळांसाठी एक या प्रमाणे क्रीडाशिक्षकाचे पद निर्माण करता येईल का याबाबत अहवाल शिक्षण आयुक्तांना मागितला आहे.
हा अहवाल येणे बाकी असताना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधिमंडळ अधिवेशनात पाच शाळांसाठी एक क्रीडा शिक्षक असे प्रमाण ठेवण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र शासनाचे कक्ष अधिकारी द. छ. शिंदे यांनी दि. २३ मार्चला शिक्षण आयुक्तांना पुन्हा पत्र पाठवून तत्काळ या संदर्भात प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले आहेत.
पदवीधर देशोधडीला लागतील
या निर्णयामुळे राष्ट्रीय स्पर्धेत कामगिरी केलेले व बीपीएड, एमपीएडची पदवी घेऊन नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या पदवीधर बेरोजगार होऊन देशोधडीला लागतील. कित्येक एमपीएड पदवीधारक तासिका तत्त्वावर तुटपुंज्या मोबदल्यात कायम नोकरीच्या आशेने काम करीत आहेत. त्यांचे स्वप्न धुळीस मिळेल. त्यामुळे शासनाने बेरोजगारांचा विचार करून निर्णय बदलावा अन्यथा तीव्र आंदोलन शिबिरात पर्याय असणार नाही. - प्रा. बाळासाहेब माने उपाध्यक्ष, क्रीडा शिक्षक महासंघ