उमेदवारांची परीक्षा!
By admin | Published: February 21, 2017 12:31 AM2017-02-21T00:31:25+5:302017-02-21T00:31:25+5:30
जि. प., पं. स. निवडणूक : ८२४ उमेदवारांचे भविष्य होणार मशीनबंद
सातारा : जिल्हा परिषदेसाठी उभ्या असणाऱ्या २८९ व पंचायत समित्यांसाठी उभ्या असणाऱ्या ५३५ अशा ८२४ उमेदवारांचे भविष्य आज, मंगळवारी मशीनबंद होणार आहे. जिल्ह्यातील २ हजार ५८४ मतदान केंद्रांवर आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार असून, सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा जाहीर प्रचार रविवारी थांबला. जिल्ह्यातील ६४ गटांत तसेच १२८ गणांमध्ये राजकीय मंडळींसह प्रशासनाने हाय अलर्ट ठेवला आहे. आज, मंगळवारी जिल्ह्यातील १९ लाख ६६ हजार ५८४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
सोमवारी दिवसभर उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला. सोमवारची रात्र तर वैऱ्याची आहे, असे समजूनच उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते रात्री उशिरापर्यंत जागे राहिले. विरोधकांकडून मतदारांची फोडाफोड होण्याची शक्यता लक्षात घेऊन बहुतांश उमेदवार सावधानता बाळगत होते.
सोमवारी प्रत्येक तालुक्यातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदान कर्मचाऱ्यांना साहित्याचे वाटप केले. संबंधित कर्मचारी मतदानकेंद्राच्या ठिकाणावर पोहोचल्याचा ‘रिपोर्ट’ आल्यावर मगच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.