निरोप, स्वागत आणि जल्लोषाला उधाण

By admin | Published: December 31, 2015 11:31 PM2015-12-31T23:31:29+5:302015-12-31T23:58:50+5:30

उत्साहाच्या चांदण्यात ‘थर्टी फर्स्ट’ साजरा : आशा, आकांक्षेच्या झुल्यावरून नववर्षाचे आगमन

Excerpt, welcome and thrive | निरोप, स्वागत आणि जल्लोषाला उधाण

निरोप, स्वागत आणि जल्लोषाला उधाण

Next

सांगली : वाढत चाललेली बोचरी थंडी आणि जल्लोष टिपेला पोहोचवत गुरुवारी सरत्या वर्षाला निरोप देण्याबरोबरच नवीन वर्षाचे स्वागत करताना शहरात उत्साहाला अक्षरश: उधाण आले होते. नियोजित मेजवानी आणि कार्यक्रमांमुळे आनंद व्दिगुणित होत होता, तर दुसरीकडे सरत्या वर्षाच्या अखेरीला नेमका मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार असल्याने अनेकांच्या ‘थर्टी फर्स्ट’च्या नियोजनावर विरजण पडल्याचे दिसून आले. दरम्यान, नवीन वर्षाचे स्वागत करताना जल्लोष आणि हुल्लडबाजीला फाटा देत शहरातील काही तरुण मंडळांनी यावर्षीदेखील ‘दारू नको, दूध प्या’सारखे उपक्रम राबवत सामाजिक बांधिलकी जपली.
शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शहरवासीयांनी जय्यत तयारी केल्याचे दिसून आले. गरुवारी दुपारपासूनच अनेक ठिकाणी ‘थर्टी फर्स्ट’च्या तयारीचे नियोजन चालू होते. शाकाहारी आणि मांसाहारी मेजवानीचे बेत आखण्यात येत होते.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल्स व ढाबेही सज्ज झाले होते. आकर्षक विद्युत रोषणाई व ग्राहकांसाठी दिलेल्या खास आॅफर्समुळे शहरातील अनेक हॉटेल्स व शहराबाहेरील ढाबे रात्री गर्दीने फुलून गेले होते. यंदा पोलीस प्रशासनाने ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’बाबत कडक पावले उचलल्याने तळीरामांनी हुल्लडबाजी करण्याचे टाळल्याचे दिसून आले. दुपारपासूनच शहरात प्रमुख चौकात पोलिसांकडून वाहनधारकांची तपासणी सुरू होती. यंदा हॉटेल्स अथवा ढाब्यावर आनंदोत्सव साजरा करण्याऐवजी अनेकांनी शहराबाहेरील निवांत ठिकाणी घरातून तयार केलेल्या पदार्थांवर ताव मारत ‘सेलिब्रेशन’ केले. नवीन वर्षाच्या स्वागताला तरुणाईसह सर्वांच्याच उत्साहाला उधाण आले होते. (प्रतिनिधी)


‘डी’ युवा ग्रुपचा उपक्रम
नववर्षाचे स्वागत करताना तरुण पिढीने व्यसनांपासून दूर रहावे यासाठी ‘डी’ युवा ग्रुपच्यावतीने शहरात ‘दारू नको, दूध प्या’ उपक्रम राबविण्यात आला. शहरात मार्केट यार्ड, कॉलेज कॉर्नर, विश्रामबाग, लक्ष्मीनगर, चांदणी चौक, शामरावनगर, खणभाग, सूतगिरणी परिसर, संपत चौक, आहिल्यादेवी होळकर चौक व बुधगाव, माधवनगर भागात ग्रुपच्यावतीने दुधाचे वाटप करण्यात आले. यावेळी राहुल पवार, विनायक रुपनर, संतोष रुपनर, विश्वास माने, सागर गडदे, प्रकाश सरगर, पृथ्वीराज सावंत, दिलीप पडूळकर, अमोल वाघमारे, अभिजित हुलवी, अश्वीन मुळके आदी उपस्थित होते.


अंनिसतर्फे नवीन वर्षाचे हटके स्वागत
अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्यावतीने सरत्या वर्षाच्या शेवटी संविधान उत्थान व जात निर्मूलन जागृती प्रतिज्ञा घेत नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. रात्री साडेदहाच्या दरम्यान सर्वजण नवीन वर्षाच्या स्वागतात व्यस्त असताना समितीच्यावतीने मात्र, जात निर्मूलनाची प्रतिज्ञा देत एका विधायक उपक्रमाला सुरुवात करण्यात आली.

सामाजिक संस्थांचा संदेश : ‘दारु नको, दूध प्या’
सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असताना, शहरातील काही तरुण मंडळे व सामाजिक संस्थांनी सामाजिक बांधिलकी जपत ‘दारू नको, दूध प्या’ सारखे उपक्रम यावर्षीही राबवत प्रबोधन साधले. सकाळपासूनच शहरातील महाविद्यालय परिसरात दुधाचे वाटप सुरु होते. सायंकाळी शहरातील प्रमुख चौकात दुधाचे वाटप सुरू होते. दूध वाटपाबरोबरच काही सामाजिक संस्थांनी व्यसनाच्या दुष्परिणामांबाबत सजग करणाऱ्या पत्रकाचे वाटपही केले.


शिवसेनेतर्फे विश्रामबाग येथे ‘दारू नको, दूध प्या’ उपक्रम राबविण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक भगवानराव शिंदे यांच्याहस्ते उपक्रमाची सुरुवात झाली. यावेळी हरिदास पडळकर, सुनील आलदर, अंकुश घुले, धनंजय शिंदे, संभाजी पुजारी, सचिन उपाध्ये, प्रसाद रिसवडे, धुंडाप्पा माळी, अशोक घोटाळे, सचिन गायकवाड, दादासाहेब पवार, विजय गडदे, डी. डी. डोंबाळे, पोपट वायदंडे, गणेश कोळी उपस्थित होते.

शाकाहारी पार्ट्यांनी घेतली मांसाहारी पार्ट्यांची जागा
नवीन वर्षाच्या स्वागताला उधाण आले असताना, अनेकांनी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार असल्याने ३० तारखेलाच, तर काहीजणांनी नववर्षाच्या पहिल्यादिवशी सेलिब्रेशनची तयारी केल्याचे सांगितले. मात्र तरीही त्यांच्या उत्साहात कमी झाली नव्हती. त्यांनी घरात गोडधोड व शाकाहारी पदार्थांची मेजवानी करत नवीन वर्षाचे स्वागत केले. त्यामुळे श्रीखंड, बासुंदीसह पनीर आणि इतर शाकाहारी पदार्थांच्या खरेदीसाठी गर्दी होती.

Web Title: Excerpt, welcome and thrive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.