गतवर्षी जादा पाऊस, तरीही यंदा सांगलीत पाणीटंचाईचे ढग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 12:21 IST2025-02-28T12:20:41+5:302025-02-28T12:21:39+5:30
३८३ गावांत उपाययोजनांची गरज

गतवर्षी जादा पाऊस, तरीही यंदा सांगलीत पाणीटंचाईचे ढग
सांगली : गतवर्षी पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा तब्बल १६४ टक्के जादा पावसाची नोंद झाली, तरीही यंदा टंचाईचे ढग घोंगावू लागले आहेत. जिल्हा परिषदेने तयार केलेल्या टंचाई आराखड्यानुसार निम्मा जिल्हा टंचाईच्या छायेखाली आहे.
७०० पैकी ३८३ गावांत टंचाईच्या उपाययोजना करावी लागू शकतात असा जिल्हा परिषदेचा अंदाज आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ५९ कोटी रुपयांचा टंचाई निवारण आराखडा तयार केला आहे. टँकरने तसेच, विहिरी अधिग्रहित करून पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव आहे. २०२३ मध्ये ३२ टक्के पाऊस कमी झाल्याने डिसेंबरपासूनच जतमध्ये टंचाई स्थिती होती. एप्रिल-मे २०२४ मध्ये सुमारे १०० हून अधिक टँकरने जत, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि तासगाव या तालुक्यांत पाणीपुरवठा करावा लागला होता.
गतवर्षी जतमध्ये १३० टक्के, खानापूरमध्ये १४० टक्के आणि कडेगावमध्ये १४३ टक्के पाऊस झाला. अन्य तालुक्यांत १७५ टक्क्यांहून अधिक पाऊस झाला. त्यामुळे कोयना धरणात सध्या ७८.३८ टीएमसी, तर वारणा धरणात २५.३१ टीएमसी पाणीसाठा आहे. त्यामुळे उन्हाळ्यात टंचाई स्थिती निर्माण झाल्यास धरणांतून पाणीपुरवठा होऊ शकतो. सध्या जतमध्ये सर्वांत कमी म्हणजे २९ टक्के पाणीसाठा आहे. तेथे मार्चपर्यंत टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. एप्रिलच्या सुमारास शिराळा, मिरज, खानापूर, कडेगावमध्ये टंचाई वाढण्याचा अंदाज आहे.
मार्चअखेर पाणीपुरवठ्यासाठी १५५ गावांना ७२ टँकर तसेच ११९ विहिरी अधिग्रहित कराव्या लागू शकतात. ऐन उन्हाळ्यात म्हणजे एप्रिल ते जूनअखेर ही संख्या वाढून ३८३ गावांना १८७ टँकर आणि २३४ विहीर अधिग्रहित करून पाणी द्यावे लागण्याची चिन्हे आहेत. यासाठी सुमारे पावणेतेरा कोटींचा खर्च अपेक्षित आहे. सिंचन योजना सुरू कराव्या लागल्यास वीजबिलांपोटी ३० कोटी रुपयांचा खर्च गृहीत धरला आहे.
जतमध्ये सर्वाधिक होरपळ
एप्रिल ते जूनमधील सर्वाधिक होरपळ जत तालुक्यात होण्याची चिन्हे आहेत. ८७ गावांना टँकरची गरज भासू शकते. मिरजेत ३८, खानापुरात ११, शिराळा आणि आटपाडीत प्रत्येकी ७, कडेगावमध्ये पाच, तर कवठेमहांकाळ आणि तासगावमध्ये प्रत्येकी एका गावाला टँकरची गरज लागण्याची शक्यता आहे.