चांदोली परिसरात अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:17 AM2021-07-22T04:17:35+5:302021-07-22T04:17:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वारणावती : चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी होत आहे. गेल्या चोवीस तासांत ६८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वारणावती : चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी होत आहे. गेल्या चोवीस तासांत ६८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धुवाॅंधार पावसातच पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक चांदोलीत येत आहेत.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने पाणलोट क्षेत्रातून १२ हजार २४२ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. धरण ७५.८७ टक्के भरले आहे. धरणाची पाणी पातळी ६१७.६० मीटर झाली आहे. धरणातून १ हजार एकशे १५ क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू आहे.
चांदोली धरण परिसर हिरवाईने नटला आहे. पावसाळ्यामुळे येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प तसेच चांदोली धरण पाहण्यासाठी बंदी आहे. कोरोनाच्या संकटामुळे तर संपूर्ण देशात लाॅकडाऊन झाले. आता काही प्रमाणात यातून सूट मिळाली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग आणि लाॅकडाऊनमुळे अनेक ठिकाणी जाण्यास बंदी आहे.
गतवर्षी चांदोलीचा पावसाळी पर्यटन हंगाम वाया गेला होता. यंदाही पावसाळा पर्यटकांविना जाऊ लागला आहे. परंतु, काही हौशी पर्यटक लाॅकडाऊन नियमांचे पालन करत चांदोली परिसरात सुट्टीचा आनंद घेत आहेत. मात्र, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व धरणावर प्रवेश नसल्यामुळे उखळू येथून अंबाईवाडाकडील सुमारे तीनशे फुटांवरुन कोसणारा धबधबा व डोंगरकपारीतील अनेक छोटे-मोठे धबधबे लांबूनच पाहून सेल्फी काढण्याचा आनंद पर्यटक घेत आहेत.
शिराळा तालुक्यातील जाधववाडीनजीक टायगर पाॅईंटवरून चांदोली धरणाचा परिसर व छोटे-मोठे धबधबे पाहण्यास मिळत आहेत. पर्यटक याचा आनंद लुटत आहेत.
210721\20210721_131744.jpg
चांदोली धरण परिसर असा हिरवाकंच दिसत आहे फोटो-,गंगाराम पाटील वारणावती