Ganpati Festival -सांगलीत बाप्पांचे उत्साहात आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 04:20 PM2020-08-22T16:20:06+5:302020-08-22T16:23:14+5:30
कोरोनाच्या संकटकाळातही भक्तीचा मळा फुलवित भाविकांनी शनिवारी बाप्पा मोरयाच्या गजरात संकटमोचक गणरायाचे जल्लोषी स्वागत केले. सडा, रांगोळ््या, सुंदर आरास, विद्युत रोषणाईचा थाट, सुगंधी द्रव्यांचा घमघमाट, धूप-अगरबत्तीचा दरवळ अशा वातावरणात घरगुती व सार्वजनिक गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
सांगली : कोरोनाच्या संकटकाळातही भक्तीचा मळा फुलवित भाविकांनी शनिवारी बाप्पा मोरयाच्या गजरात संकटमोचक गणरायाचे जल्लोषी स्वागत केले. सडा, रांगोळ््या, सुंदर आरास, विद्युत रोषणाईचा थाट, सुगंधी द्रव्यांचा घमघमाट, धूप-अगरबत्तीचा दरवळ अशा वातावरणात घरगुती व सार्वजनिक गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
यंदा गणेशोत्सवावर कोरोनाच्या संकटाचे सावट आहे. सांगली शहरासह जिल्ह्यात सर्वत्र रुग्णसंख्या वाढत असून या संकटातून जिल्ह्याला पर्यायाने देशाला बाहेर काढण्याचे साकडे घालत भाविकांकडून गणरायाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. पहाटेपासूनच सांगली शहरात गणेशोत्सवाची लगबग सुरू होती. मूर्तीकारांनी पहाटे दुकाने उघडली. त्यानंतर सकाळपासून मूर्ती नेण्यासाठी भाविकांनी बाजारात गर्दी केली. फुला-फळांच्या बाजारातही दिवसभर गर्दी होती.
दिवसभर सांगलीच्या हरभट रस्ता, मारुती रस्ता, बालाजी चौक परिसरात साहित्य खरेदीसाठी गर्दी होती. मारुती रस्ता, गावभाग, बसस्थानक परिसर, कर्मवीर भाऊराव पाटील चौक याठिकाणी मूर्ती खरेदीसाठी गर्दी होती. कोरोनामुळे यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय गणेश मंडळांनी घेतल्यामुळे शहरात दिवसभर सवाद्य मिरवणुका दिसल्या नाहीत. शांततेत आणि बाप्पा मोरयाच्या गजरात साध्या पद्धतीने गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.