गणेशोत्सवाच्या खरेदीचा उत्साह शिगेला, रस्ते फुलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:32 AM2021-09-09T04:32:03+5:302021-09-09T04:32:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी शहरतील रस्ते फुलले आहेत. घरगुती उत्सवाच्या तयारीसाठी सांगलीकर मोठ्या संख्येने बाहेर पडल्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी शहरतील रस्ते फुलले आहेत. घरगुती उत्सवाच्या तयारीसाठी सांगलीकर मोठ्या संख्येने बाहेर पडल्याने दिवसभर ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.
बाप्पांचे आगमन अवघ्या काही तासांवर आल्याने भाविकांच्या उत्साहाला उधाण आले आहे. मुख्य रस्त्यांवर सकाळपासूनच सणाचा माहोल होता. हरभट रस्ता, मारुती रस्ता, शिवाजी पुतळा परिसर, गारमेंट चौक, गणपती पेठेत दुकाने ग्राहकांनी भरली होती. रोषणाई व सजावटीच्या साहित्याने बाजारपेठा फुलल्या आहेत. शेले, आसने, कृत्रिम फुले, माळा, रंगीबेरंगी दिवे, घरगुती उत्सवासाठी छोटे मंडप यांची मोठी उलाढाल दिवसभरात झाली. पुजेसाठी फळांचे स्टॉल बुधवारपासूनच लागले आहेत. मारुती रस्त्यावर गणेश मूर्तींचे स्टॉलही मोठ्या संख्येने लागले आहेत. अनेक वर्षांच्या परंपरेनुसार ठरलेल्या मूर्तिकारांकडेच गणेशमूर्ती बुकिंगसाठी भाविक बाहेर पडले आहेत. मिरज रस्त्यावर जिल्हा बँकेसमोरील स्टॉलवरही गर्दी पाहायला मिळाली. शाडूच्या मूर्तीला गणेशभक्तांची पसंती असली, तरी किंमत व उपलब्धता याचा ताळमेळ घालावा लागत आहे.
उत्सवासाठी कृत्रिम फुलांच्या माळा, बुके, थर्माकोलची प्रभावळ, प्लास्टिक मण्यांच्या माळा आदी साहित्याच्या विक्रीसाठी परप्रांतीयांनीही गर्दी केली आहे. मिरज, माधवनगर, कोल्हापूर रस्त्यांवर त्यांनी स्टॉल मांडले आहेत. पंचमुखी मारुती रस्त्यावर गणेशमूर्तींचे स्टॉल व रोषणाईच्या साहित्याच्या दुकानात सकाळपासूनच गर्दी होती.
शहरात सर्वत्र कोरोनाची फिकीर न करता लोकांनी रस्त्यावर गर्दी केली. सोशल डिस्टन्सिंगचा पत्ताच नव्हता. अनेकांनी मास्कही घातले नव्हते.
चौकट
चायनीज साहित्याचे वर्चस्व कायम
उत्सवासाठी बाजारपेठेत चायनीज साहित्याचे वर्चस्व कायम आहे. विशेषत: रोषणाईसाठी चायनीज दिव्यांचीच सर्वत्र रेलचेल आहे. आकर्षकता आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यातील किंमत यामुळे व्यापाऱ्यांनीही चायनीज साहित्य उपलब्ध केले आहे.