सभापतींनी अडविल्या फायली

By admin | Published: January 3, 2017 11:28 PM2017-01-03T23:28:50+5:302017-01-03T23:28:50+5:30

स्थायी समिती सभा : काँग्रेस नगरसेवकांचा आरोप; हाच काय पारदर्शी कारभार?

Executed files by the Speaker | सभापतींनी अडविल्या फायली

सभापतींनी अडविल्या फायली

Next



सांगली : महापालिकेतील विकास कामांच्या फायली मंजुरीनंतर सील करण्याचे अधिकार नगरसचिव व स्थायी सदस्याला असताना, सील केलेल्या फायली सभापती संगीता हारगे यांनी अडविल्या आहेत. फायली अडविण्यामागे राष्ट्रवादीचा काय हेतू आहे?, हाच का त्यांचा पारदर्शी कारभार? असा सवाल नगरसेवक दिलीप पाटील यांनी केला. तसेच सभापती हारगे यांनी, परस्पर फायली फिरविणाऱ्या ठेकेदारासह अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला.
सभापती हारगे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी स्थायी समितीची सभा झाली. या सभेत दिलीप पाटील यांनी, फायली सील करण्याची प्रक्रिया काय? असा सवाल नगरसचिवांना केला. नगरसचिवांनी उत्तर देण्यापूर्वीच सभापती हारगे यांनी, आपणच फायली थांबविल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर दिलीप पाटील, संतोष पाटील यांनी कायद्यातील तरतुदी सांगत, स्थायी सदस्य, नगरसचिवांच्या सहीने फाईल सील केली जाते. सील केलेल्या फायली थांबविण्याचे कोणालाच अधिकार नाहीत, असे सांगत, फायली थांबविल्याने त्यात भ्रष्टाचाराला वाव आहे. पारदर्शी कारभार करू म्हणणाऱ्या राष्ट्रवादीचा हाच काय पारदर्शी कारभार?, असा सवाल केला. सभापती हारगे यांनी विकास कामांच्या फायली ठेकेदारच हाताळतात. विभागप्रमुखांकडून फायली पुढे येत नाहीत. वास्तविक ही जबाबदारी विभागप्रमुखांची आहे. यापुढे ठेकेदाराने फाईल हाताळल्याचे निदर्शनास आल्यास अधिकाऱ्यासह त्याच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला.
गेल्या आठवड्यात विषयपत्र नसल्याने स्थायीची सभा घेण्यात आली नाही. वास्तविक नगरसचिव कार्यालयाकडे १३ विषयपत्रे प्रलंबित होती. त्यात कीटकनाशक खरेदी, मदनभाऊंच्या स्मारकाच्या कामाचा समावेश होता. मदनभाऊंच्या स्मारकाचे काम पूर्ण होऊ नये, यासाठीच सभा घेण्यात आली नाही, असा आरोपही पाटील यांनी केला. बसवेश्वर सातपुते यांनी, मिरजेतील रोडस्वीपर सहा वर्षे पडून असून, ट्रॅक्टरला गंज चढला आहे. तो वापरात आणावा, अशी मागणी केली. प्रदीप पाटील यांनी, बदली कामगारांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव मांडला. अलका पवार यांनी, कोल्हापूर रस्त्यावरील भोबे गटारीची पाईप जोडण्याचे काम तातडीने करावे, अशी मागणी केली.
विश्रामबाग उड्डाण पुलाचे काम सुरू असून, तेथील दिवाबत्ती बंद करण्यात आल्याचे संतोष पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. यावर येत्या चार दिवसांत पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेश सभापतींनी दिले. शहरातील दिवाबत्ती बंद असून, दुरूस्तीची गाडीच खराब झाली आहे. त्याच्या देखभाल-दुरुस्तीचे काम संबंधित मिस्त्रीकडे आहे. त्याचे बिल देऊ नये, अशी बोळाज यांनी मागणी केली.
सभेत अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या कामासाठी ४४ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला. प्रियंका बंडगर यांनी हा स्मारकाचा प्रश्न उपस्थित केला होता. (प्रतिनिधी)
वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दीसाठी समिती

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महापालिकेकडून विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची मागणी स्थायी समितीचे माजी सभापती संतोष पाटील यांनी केली. यावर सभेत चर्चा होऊन समिती गठित करण्याचा प्रस्ताव महासभेकडे पाठविण्याची हमी सभापती संगीता हारगे यांनी दिली.

Web Title: Executed files by the Speaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.