विट्यात व्यापाऱ्यांना संकलित करात सूट द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:19 AM2021-06-24T04:19:18+5:302021-06-24T04:19:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विटा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने केलेल्या लॉकडाऊनमध्ये विटा शहरातील व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्यात आले. त्यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने केलेल्या लॉकडाऊनमध्ये विटा शहरातील व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्यात आले. त्यामुळे नगरपालिकेने संकलित करात सूट देऊन व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे तालुका कार्याध्यक्ष पंकज दबडे यांनी मुख्याधिकारी अतुल पाटील यांच्याकडे निवेदनाव्दारे केली.
निवेदनात म्हटले आहे की, गेल्यावर्षीपासून कोरोना रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. त्यामुळे मार्च २०२० पासून व्यवसाय ठप्प झाला. त्यानंतर गेल्या दिवाळीच्या दरम्यान काही प्रमाणात व्यवसाय सुरू होत असतानाच पुन्हा मार्च २०२१ पासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लॉकडाऊन झाल्याने व्यावसायिक दुकाने बंद करण्यात आली. परिणामी, व्यापाऱ्यांचे उत्पन्न ठप्प झाले.
विटा शहरात खासगी, शासकीय व नगरपरिषदेच्या मालकीची व्यापारी संकुल आहेत. गेल्यावर्षीपासून व्यवसायात अस्थिरता निर्माण झाल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने त्यांच्या अधिकारात संकलित करात सूट देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
या मागणीचे निवेदन मुख्याधिकारी अतुल पाटील यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा सरचिटणीस पै. सत्यजित पाटील, विक्रम भिंगारदेवे, विटा शहराध्यक्ष धीरज पाटील, अविनाश शितोळे, ओंकार शिंदे उपस्थित होते.