रासायनिक खते उतरण्यासाठी संचारबंदीतून सूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:26 AM2021-04-22T04:26:25+5:302021-04-22T04:26:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : खरीप हंगाम महिन्यावर आल्यामुळे देशभरातून रासायनिक खते, बियाणे घेऊन मालवाहू रेल्वेगाडी येत आहेत. या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : खरीप हंगाम महिन्यावर आल्यामुळे देशभरातून रासायनिक खते, बियाणे घेऊन मालवाहू रेल्वेगाडी येत आहेत. या गाड्यांमधील माल उतरून घेणे आणि वाहतुकीसाठी संचारबंदीतून जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सवलत दिली आहे, अशी माहिती असोसिएशनचे उपाध्यक्ष संजय निलावार यांनी दिली. तसेच दुकानातून खते, बियाणे विकी सकाळी ७ ते ११ या वेळेतच करावी लागणार आहे.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक संचारबंदी लागू केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी मंगळवारपासून सांगली जिल्ह्यात कडक संचारबंदी लागू केली आहे. या निर्णयामुळे रासायनिक खते, बियाणे आणि औषधे साठवणूक व माल उतरून घेण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. म्हणून सांगली ॲग्रीकल्चर इनपुट्स डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश पाटील, उपाध्यक्ष संजय निलावार, आदी पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांची भेट घेऊन संचारबंदीतून कृषी दुकानदारांना सूट देण्याची मागणी केली आहे. तसेच रासायनिक खते, बियाणे घेऊन रेल्वे वॅगन आल्यानंतर नऊ तासांमध्ये माल खाली करावा लागतो. तसेच रेल्वे धक्क्यावरून बारा तासांत माल उचलावा लागत आहे, अन्यथा रेल्वेकडून लाखो रुपये दंड होतो. यातून मार्ग काढण्याची असोसिएशनने मागणी केली होती.
यावर जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी रेल्वेतून येणारा माल उतरून घेणे आणि वाहतुकीसाठी सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत सवलत देण्यात येईल; पण कृषी दुकानदारांकडून मालाच्या विक्रीसाठी सकाळी ७ ते ११ हीच वेळ राहील. विक्रीसाठी कोणत्याही प्रकारे मुदतवाढ दिली जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे.