येडेमच्छिंद्रचा पदांचा वनवास संपला
By admin | Published: March 15, 2017 11:52 PM2017-03-15T23:52:53+5:302017-03-15T23:52:53+5:30
वाळव्याच्या सभापतीपदी संधी : सचिन हुलवान यांच्या निवडीने कार्यकर्त्यांचा जल्लोष
निवास पवार ल्ल शिरटे
दोन खासदार, जि. प. सभापती, सदस्य यासह कराड-वाळवा तालुक्यातील विविध संस्थांवर महत्त्वाची पदे भूषविणारे येडेमच्छिंद्र हे वाळवा तालुक्यातील गाव. पंचायत समितीच्या सदस्यपदापासूनच ५५ वर्षांपासून वंचित होते. यावेळी सचिन हुलवान यांच्या रुपाने हे सदस्यत्व पदरात पडले आणि आज हुलवान यांच्या गळ्यात सभापतीपदाची माळ पडल्याने क्रांतिसिंहांची जन्मभूमी असणाऱ्या या गावाचा पंचायत समितीमधील वनवास अखेर संपल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत होती.
हुलवान यांची सभापतीपदी बिनविरोध निवड जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करुन आनंदोत्सव साजरा केला. रेठरेहरणाक्ष जिल्हा परिषद गट ओ. बी. सी. साठी आरक्षित झाल्यानंतर हुलवान हे जिल्हा परिषदेसाठी प्रबळ इच्छुक होते. मात्र राजकीय घडामोडीत राष्ट्रवादीच्या तडजोडीत हुलवान यांना एक पाऊल मागे घेऊन पंचायत समितीसाठी अर्ज दाखल करण्यास पक्षश्रेष्ठींनी सांगितले होते. यासाठी हुलवान यांची तयारी नव्हती. तरीही पक्षप्रेमापोटी त्यांनी पं. स. साठी अर्ज दाखल केला.
हुलवान यांना निवडणुकीत मिळवलेल्या यशाची पोहोच पावतीच माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी दिल्याचे राजारामबापू बँकेचे संचालक अॅड. संग्राम पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.
निवडीनंतर जि. प. सदस्य धनाजी बिरमुळे यांच्याहस्ते नूतन सभापती हुलवान यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उमेश पवार, दिलीपराव देसाई, संग्राम पाटील, सरपंच संजय पाटील, सुनील पोळ, विशाल पवार, हौसेराव पाटील, शिवाजीराव पाटील, धनंजय पाटील, कुलदीप पाटील, सुहास पाटील, प्रा. आनंद पाटील, अभियंता सतीश देसाई, जाालिंदर पाटील, यशवंत पाटील, दत्तात्रय सावंत, प्रवीण हुलवान, निवास खंडागळे, पुरुषोत्तम पाटील, ग्रामसेवक जयवंत थोरात आदी उपस्थित होते.