व्यापारी पेठांचे प्रशस्त जागी विस्तारीकरण करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:24 AM2021-08-01T04:24:49+5:302021-08-01T04:24:49+5:30
सांगली : महापुरात व्यापारी पेठांचे नुकसान हा आता दरवर्षीचा भाग बनत आहे. त्यामुळे या व्यापारी पेठांचे स्थलांतर नव्हे, तर ...
सांगली : महापुरात व्यापारी पेठांचे नुकसान हा आता दरवर्षीचा भाग बनत आहे. त्यामुळे या व्यापारी पेठांचे स्थलांतर नव्हे, तर प्रशस्त जागेत विस्तारीकरण करून हा प्रश्न कायमचा निकाली काढावा, अशी मागणी व्यापारी एकता असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.
असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सांगलीची प्रमुख बाजारपेठ ही चार रस्त्यांवर वसली आहे. महापालिका क्षेत्रासह जिल्हा व तालुक्यातील सर्व ग्राहक हे फक्त या चार रस्त्यांवर एकवटतात. ही बाब अडचणीची होत आहे. हीच मुख्य बाजारपेठ आता पूरपट्ट्यात आहे. नदीची पाणीपातळी ३५ फूट झाली तरी बाजारपेठेत धास्ती निर्माण होते. एकंदरीतच हे संकट आता दरवर्षीचे आहे. साधारण पूर येऊन गेल्यानंतर सगळे नियमित होण्यास महिनाभराचा कालावधी जातो. दुकानदार आणि ग्राहक या दोघांची यामुळे गैरसोय होत असते. त्यामुळे या बाजारपेठेचा ग्राहक हा इतर शहरात जात आहे.
कर्नाटकच्या नूतन मुख्यमंत्र्यांनी अलमट्टीची उंची वाढवणार असल्याचे जाहीर केले आहे. असे जर घडले, तर या पेठा कायमस्वरूपी रेड झोनमध्ये येतील. त्यामुळे आता स्थानिक प्रशासनाने ही प्रमुख बाजारपेठ विस्तारित करण्यासाठी विनाविलंब कार्यवाही सुरू करावी. वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धर्तीवर सांगलीत मोठी जागा उपलब्ध करून शासनाने द्यावी. ज्याठिकाणी घाऊक व अन्य बाजारपेठ विकसित होईल. कुरिअर, ट्रान्सपोर्ट, बँकिंग एकाच ठिकाणी असावी. ज्यामुळे सांगलीची ओळख तर निर्माण होईलच; पण येथील उलाढाल वाढून शहराचा व पर्यायाने जिल्ह्याचा विकास साधला जाईल.
स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी, विद्यमान सत्ताधारी मंत्री, विरोधी आमदार, खासदार या सर्वांनी प्रामाणिकपणे व इच्छाशक्तीच्या जोरावर एकत्रितपणे प्रयत्न केले, तर सांगलीचा विकास साधला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.