शिरगाव येथे कृष्णेत मृत माशांचा खच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:18 AM2021-06-19T04:18:49+5:302021-06-19T04:18:49+5:30
वाळवा : नागराळे ते शिरगाव (ता. वाळवा) दरम्यान कृष्णा नदीच्या पात्रात रसायनयुक्त पाण्यामुळे मृत मासे तरंगत होते. माशांचा खच ...
वाळवा : नागराळे ते शिरगाव (ता. वाळवा) दरम्यान कृष्णा नदीच्या पात्रात रसायनयुक्त पाण्यामुळे मृत मासे तरंगत होते. माशांचा खच पडल्याचे वृत्त समजल्यावर नागरिकांनी मासे गोळा करण्यासाठी नदीकाठावर गर्दी केली होती.
कृष्णा नदी अतिवृष्टीमुळे दुथडी भरून वाहत आहे. याचा फायदा घेऊन साखर कारखानदारांनी रसायनयुक्त पाणी नदीत सोडले आहे. कऱ्हाडपासून कृष्णा व कोयना नद्यांच्या काठावरील बरेच साखर कारखाने कृष्णेची पाणीपातळी वाढली की रसायनयुक्त पाणी कृष्णा नदीच्या पाण्यात सोडतात, यामुळे जलचर प्राणी नष्ट होतात व जलप्रदूषण वाढते. नदीच्या पाण्याला गटारगंगेचे स्वरूप प्राप्त होते.
नागराळे व शिरगाव नदीच्या काठावर शुक्रवारी दुपारपासून नागरिक मासे गोळा करत होते. हे मासे आरोग्यासाठी अपायकारक आहेत. आधीच कोरोना महामारी सुरू आहे. त्यात या मृत माशांचा खाना यांमुळे विविध प्रकारच्या आजारांना निमंत्रण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.