सांगलीतील कवठेपिरान, पायाप्पाचीवाडीत कालबाह्य खते, औषधे जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 04:09 PM2023-11-29T16:09:44+5:302023-11-29T16:10:25+5:30

कृषी विभागाची कारवाई : जिल्हा ॲग्रो फार्म प्रोड्युसर कंपनीच्या कृषी केंद्रात विक्री

expired fertilizers medicines seized in Payappachiwadi, Kavthepiran in Sangli | सांगलीतील कवठेपिरान, पायाप्पाचीवाडीत कालबाह्य खते, औषधे जप्त

संग्रहित छाया

सांगली : कवठेपिरान (ता. मिरज) आणि पायाप्पाचीवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील सांगली जिल्हा ॲग्रो फार्म प्रोड्युसर कंपनीच्या कृषी सेवा केंद्रामधील मुदतबाह्य साडेसहा लाखांची खते आणि कीटकनाशके जप्त केली. सांगलीतील कृषी विभागाच्या भरारी पथकाने मंगळवारी कारवाई केली.

पायाप्पाचीवाडी येथील लता विठ्ठल जाधव यांच्या तक्रारीनुसार कृषी विभागाकडून चौकशी चालू आहे. चौकशी समितीसाठी जिल्हा परिषदेचे प्रभारी कृषी विकास अधिकारी स्वप्नील माने यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली होती. या समितीचे सचिव जिल्हा गुणनियंत्रक सुरेंद्र पाटील, सदस्य उपविभागीय कृषी अधिकारी रमाकांत भजनावळे यांच्या समितीने सोमवारी दिवसभर कंपनीच्या कवठेपिरान आणि पायाप्पाचीवाडी येथील कृषी केंद्रावर छापा टाकला.

यामध्ये पायाप्पाचीवाडी येथील कृषी सेवा केंद्रामध्ये दोन लाख ४२ हजार ७९० रुपयांची मुदतबाह्य रासायनिक खते, जैविक, कृषी संजीवके जप्त केली आहेत. तसेच उर्वरित सहा लाख ३९ हजार २४३ खतांवर विक्री बंदचे आदेश देण्यात आले आहेत. तीन लाख चार हजार ७५५ रुपयांचे कीटकनाशकेही जप्त केली आहेत.

कवठेपिरान येथील कृषी सेवा केंद्रामध्ये ८४ हजार ९८५ रुपयांचे कालबाह्य रासायनिक व जैविक खत, कृषी संजीवके जप्त केली आहेत. तसेच वापरास योग्य अशी पाच लाख ७२ हजार १८५ रुपयांची खते सापडली आहेत. या खतांवरही विक्री बंदचे आदेश कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत. ८ हजार ८४१ रुपयांची कीटकनाशके कालबाह्य सापडली असून संबंधित कंपनीच्या दोन्ही कृषी केंद्राला विक्री बंदचे आदेश कृषी विभागाकडून दिले आहेत, अशी माहिती समितीचे अध्यक्ष स्वप्नील माने यांनी दिली. या समितीकडून बुधवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे अहवाल देण्यात येणार आहे.

कवठेपिरानचा परवाना रद्द

कवठेपिरान येथील जिल्हा ॲग्रो फार्म प्रोड्युसर कंपनीच्या कृषी सेवा केंद्रातून युरिया विक्रीत अनियमितता दिसून आली होती. याप्रकरणी कंपनीचा खताचा परवाना निलंबित केला आहे, अशी माहिती स्वप्नील माने यांनी दिली.

Web Title: expired fertilizers medicines seized in Payappachiwadi, Kavthepiran in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.