जत तालुक्यात कालबाह्य पोषण आहार

By admin | Published: June 30, 2015 11:21 PM2015-06-30T23:21:00+5:302015-06-30T23:21:00+5:30

ठेकेदाराचा प्रताप : बालके, गरोदर स्त्रियांच्या आरोग्याला धोका

Expired nutrition diet in Jat taluka | जत तालुक्यात कालबाह्य पोषण आहार

जत तालुक्यात कालबाह्य पोषण आहार

Next

गजानन पाटील -संख -महिला व बालकल्याण विभागांतर्गत असलेल्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या जत तालुक्यातील अंगणवाड्यांमध्ये बालक, गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना कालबाह्य पोषण आहार वाटप करण्यात आला आहे.
उत्पादक कंपनीने पोषण आहाराच्या पाकिटावर असलेले बॅच नंबर, उत्पादनाचा दिनांक शाई लावून पुसण्याचा धक्कादायक प्रकार केला आहे. कालबाह्य झालेला पोषण आहार गरोदर स्त्रिया व स्तनदा माता, बालकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करणार आहे. या विभागाच्या भोंगळ कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
तालुक्यामध्ये मोठ्या अंगणवाड्या ३४५, मिनी अंगणवाड्या ८० आहेत. अंगणवाड्यांमध्ये ० ते ६ वर्षे वयोगटातील १६ हजार ४२९ विद्यार्थी शिकत आहेत. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे जत व उमदी प्रकल्प आहेत. अंगणवाडी सेविकांतर्फे गावातील बालक, गरोदर स्त्रिया, स्तनदा माता कुपोषित बालकांचा सर्व्हे करण्यात येतो.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पातून सूक्ष्म पोषक तत्त्वांनी समृद्ध केलेला ब्लेंडेड पोषण आहार पाककृती १ व २ असे आहाराचे वाटप केले जाते. ठेकेदाराकडून पोषण आहार पुरविला जातो.
तालुक्यातील अंगणवाड्यांना पसायदान महिला संस्था सांगली या उत्पादक युनिटकडून पोषण आहार पुरविला जातो. एका महिन्याचे बालक, गरोदर स्त्रिया व स्तनदा माता यांना आहार दिला जातो. महिन्यातून पाककृती १ व पाककृती २ असे दोन पिशव्यांचे वाटप केले जाते. त्याचे वजन १८२० ग्रॅम आहे. बालकांना पोषण आहारामध्ये शिरा, उपमा, तर गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना शिरा, सुकडी दिली जाते. प्लॅस्टिक गोण्यांमध्ये २० पाकिटे असतात. पिशव्यांवर बॅच नंबर, उत्पादनाचा दिनांक, उपयोगाचा अंतिम कालावधी नमूद केला आहे.
परंतु कालबाह्य झालेल्या पोषण आहारातील पाकिटाच्या बॅच नंबर, उत्पादनाच्या दिनांकावर शाई लावण्यात आली आहे, तर काही पाकिटांवर उत्पादनाची १६ एप्रिल २०१५ ही तारीख आहे. उपयोगाचा अंतिम कालावधी उत्पादन केल्याच्या तारखेपासून ६ महिनेपर्यंत आहे, असा शिक्का आहे. म्हणजेच पाकिटे १६ जूनलाच कालबाह्य झाली आहेत. अंगणवाड्यांना १५ ते २० जूनपर्यंत ती वाटप करण्यात आली आहेत.
कालबाह्य पोषण आहारामुळे बालकांच्या शारीरिक विकासावर त्याचा गंभीर परिणाम होतो. गर्भावर परिणाम होतो. स्तनदा मातांच्या आरोग्यावर परिणाम होतो. ठेकेदारांनी पुरविलेल्या पोषण आहाराचा दर्जा तपासला जात नाही. कालबाह्य आहाराची माहिती असूनही त्याचे वाटप झाले आहे. वाटप करताना, आहार कालबाह्य झालेला आहे, जनावरांना खायला घाला, असा मौलिक सल्ला सेविकांना वरिष्ठांनी दिला आहे. म्हणजेच माहिती असूनही ठेकेदाराचे हित जपण्याचा प्रयत्न झाला आहे.
कालबाह्य झालेली पोषण आहाराची पाकिटे परत का पाठविली गेली नाहीत?, असा संतप्त सवाल पालकांतून उपस्थित केला जात आहे. या विभागाच्या निष्काळजीपणामुळे तो लवकर वाटप करण्यात आलेला नाही का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
बालके, गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांच्या आरोेग्याशी खेळणाऱ्या या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.


बिस्किटेही वादाच्या भोवऱ्यात
जत तालुक्यातील अनेक गावांमध्ये पोषण आहाराप्रमाणेच अंगणवाडीतील लहान मुलांना दिली जाणारी बिस्किटेही चांगल्या प्रतवारीची व गुणवत्तेची नाहीत, कमी दर्जाची आहेत, निकृष्ट आहेत. तीही वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत.


अंगणवाडीतील पोषण आहार कालबाह्य झालेला आहे. याची पंचायत समितीकडे तक्रार केली आहे. चौकशी करण्याचे आश्वासन दिले, पण त्यावर कोणतीही चौकशी झालेली नाही. कालबाह्य पोषण आहार परत घ्यावा, दुसरा द्यावा.
- भैरु कांबळे,
सामाजिक कार्यकर्ते, दरीबडची


पोषण आहाराबाबत तक्रार आल्यानंतर आम्ही संबंधित आहार पुरविणाऱ्या ठेकेदारांशी पत्रव्यवहार केला आहे. त्याने यापुढे आपल्याकडून अशी चूक होणार नाही, असे लिहून दिले आहे. पोषण आहार कालबाह्य झालेला नाही. तो आजही चालतो.
- ए. आर. मडके
सहायक गटविकास अधिकारी

Web Title: Expired nutrition diet in Jat taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.