निर्यातीची किटली थंड; दरवाढीने चहा वाफाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:19 AM2021-07-15T04:19:18+5:302021-07-15T04:19:18+5:30
अविनाश कोळी लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : वाफाळलेल्या गरमागरम चहाचा आस्वाद घेण्याची परंपरा अबाधित असल्याने जगभरात चहाचा बाजार स्थिर ...
अविनाश कोळी
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : वाफाळलेल्या गरमागरम चहाचा आस्वाद घेण्याची परंपरा अबाधित असल्याने जगभरात चहाचा बाजार स्थिर आहे. गतवर्षाच्या तुलनेत यंदा ५ टक्के निर्यात घटल्यानंतरही दराच्या तेजीमुळे भारतीय निर्यातदारांना १२ टक्के अधिक लाभ झाला. दुसरीकडे भारतातील चहाचा खप कडक लॉकडाऊन असतानाही कायम राहिला आहे.
देशातील चहा उत्पादनात यावेळी वाढ झाली आहे. द युनायटेड प्लँटर्स असोसिएशन ऑफ सदर्न इंडिया (उपासी) ने दिलेल्या अहवालानुसार जानेवारी ते मे २०२० मध्ये भारतातील चहा उत्पादन २१० मिलियन किलो इतके झाले होते. यावर्षी याच काळात २७५ मिलियन किलो उत्पादन झाले आहे. म्हणजेच ३० टक्के उत्पादन वाढ दिसत आहे. दुसरीकडे कोरोनामुळे निर्यातीवर थोडा परिणाम जाणवत आहे.
टी बोर्ड ऑफ इंडियाने दिलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी ते एप्रिल २०२० च्या तुलनेत यंदा याच चौमाहीत भारतीय चहाची निर्यात ५.१७ टक्क्यांनी घटली आहे, मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात चहाच्या दरात तेजी असल्याने १२ टक्क्यांनी उत्पन्न वाढले आहे. निर्यातीमधून भारतास जानेवारी ते एप्रिल या काळात १ हजार ४८० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. २०२० मध्ये या काळात चहाचा दर २१४.९१ रुपये किलो होता. यंदा तो २५५ च्या घरात आहे. दरात जवळपास १८.८१ टक्के वाढ झाली आहे.
चौकट
‘ग्रीन टी’चा कप गरमच
देशात, विदेशात ‘ग्रीन टी’ची मागणी गतवर्षाच्या कोरोना काळात वाढली होती. यावर्षीही ती कायम आहे. अन्य चहाप्रमाणे याचीही निर्यात कमी झाली असली, तरी दरात ९.७० टक्के वाढ झाली आहे. ‘ग्रीन टी’चे देशांतर्गत वार्षिक उत्पादन २० ते २५ मिलियन किलो इतके असते. मागील जानेवारीच्या तुलनेत जानेवारी २०२१ मध्ये ग्रीन टीचे उत्पादन किंचीतसे घटले होते, मात्र फेब्रुवारी व मार्च महिन्यात तुलनेत उत्पादनात वाढ झाली आहे.
कोट
लॉकडाऊन असला तरी देशातील चहाचा वापर कमी झालेला नाही. मागणीत वाढ होत आहे. ब्रँडेड व विशेषत: पॉलिपॅकमधील चहाला अधिक मागणी आहे. ‘ग्रीन टी’ला कोरोना काळात वाढलेली पसंतीही टिकून आहे.
- राजेशभाई शहा, चहा उद्योजक, सांगली