सांगली जिल्ह्यातून निर्यातीला प्रारंभ, आखाती देशांत द्राक्षाचे चार कंटेनर रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 05:32 PM2020-12-28T17:32:27+5:302020-12-28T17:35:13+5:30
सांगली जिल्ह्यातून द्राक्ष निर्यातीला सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यात मिरजेतील खासगी निर्यातदार कंपनीकडून चार कंटेनरमधून ६० टन द्राक्षे आखातात रवाना झाली. १० जानेवारीपासून निर्यात वेग घेईल. दरम्यान, निर्यातीदरम्यानच्या ७ टक्के कटला पद्धतीविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत.
सांगली : जिल्ह्यातून द्राक्ष निर्यातीला सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यात मिरजेतील खासगी निर्यातदार कंपनीकडून चार कंटेनरमधून ६० टन द्राक्षे आखातात रवाना झाली. १० जानेवारीपासून निर्यात वेग घेईल. दरम्यान, निर्यातीदरम्यानच्या ७ टक्के कटला पद्धतीविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत.
गेल्यावर्षी मार्चमध्ये लॉकडाऊनच्या नावाखाली व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची अक्षरश: लूट केली. यंदा मात्र तशी स्थिती नाही. लांबलेल्या पावसाने छाटण्या खोळंबून सुमारे २० टक्के बागा वाया गेल्या. त्यामुळे द्राक्षे मुबलक नाहीत. कोरोनावर आरोग्यदायी म्हणून मागणीही चांगली आहे. साहजिकच चांगला दर मिळत आहे.
पहिल्याच टप्प्यात दणकेबाज दर
सध्या सुपर सोनाकाला चार किलोच्या पेटीला ३५० ते ४१० रुपये दर मिळत आहे. आरके ३७० ते ४२०, अनुष्का ४०० ते ४२०, मिडियम सुपर ३२० ते ३५० असा दणदणीत दर आहे. शरदला चक्क ५५० ते ६०० रुपये मिळत आहे.
कटल्याविरोधात बागायतदार आक्रमक
निर्यातीच्या द्राक्षामध्ये ७ टक्के कटला घेतला जातो. म्हणजे एकूण द्राक्षापैकी ७ टक्के खराब म्हणून काढली जातात. घट-तूटीच्या नावाखाली कमी पैसे दिले जातात. याविरोधात शेतकरी आक्रमक झालेत. निर्यातीच्या बागा व्यापार्याकडे उतरणीसाठी देण्यापूर्वी शेतकरी स्वत:च खराब माल बाजुला काढतात, तरीही प्रत्यक्ष हार्वेस्टींगवेळी पुन्हा ७ टक्के कटला घेतात. अशा व्यापार्यांना हार्वेस्टींग करु देणार नाही अशी शेतकर्यांची भूमिका आहे. हार्वेस्टींग करणारी टोळी प्रत्येक गाडीमागे ५०० ते २००० रुपयांची खुशाली घेते. अशा कंपन्या अथवा व्यापार्यांना माल देऊ नये असे आवाहन करण्यात येत आहे.
सात टक्के कटल्यामुळे निर्यातीच्या द्राक्षांना स्थानिक बाजारपेठेचाच दर मिळतो. बागेसाठी लाखो रुपये खर्चानंतरही भुर्दंड सोसावा लागतो.
- नागेश कुंभार,
बागायतदार, सावळज
घट, तूट आणि चांगल्या मालाच्या नावाखाली कटला घेतला जातो. यामुळे शेतकर्याची थेट लूट होते. निर्यातीसाठी जीवापाड जपलेल्या बागेतील मालाची नासाडी होते.
- अनिल माळी,
बागायतदार, सावळज