निर्यात, इंधन दरवाढीने तांदूळ महागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:26 AM2021-03-05T04:26:45+5:302021-03-05T04:26:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : यंदा निर्यातीत सातत्याने होत असलेली वाढ व इंधनातील दरवाढ देशांतर्गत बाजारपेठेत तांदळाच्या महागाईस कारणीभूत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : यंदा निर्यातीत सातत्याने होत असलेली वाढ व इंधनातील दरवाढ देशांतर्गत बाजारपेठेत तांदळाच्या महागाईस कारणीभूत ठरत आहे. गेल्या तीन महिन्यांत बिगर बासमती तांदळाच्या दरात २० ते २२ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्यांना मोठा फटका बसला आहे.
तांदूळ हा आहारातील महत्त्वाचा घटक असल्याने त्याच्या महागाईचे चटके सर्वांना बसू लागले आहेत. याला निर्यातीत होत असलेली वाढ व इंधन दरवाढ कारणीभूत आहे. त्याचबरोबर पावसामुळे तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात फटका बसल्यानेही मालाची आवक कमी होऊन त्याचा दरावर परिणाम होत आहे. मे महिन्यात नवा माल बाजारात आल्यानंतर दर काहीअंशी कमी होतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी आणखी दोन महिने दरवाढीचे चटके सामान्यांना सोसावे लागणार आहेत.
भारतातून सध्या अमेरिका, बांगलादेश, नेपाळ, सोमालिया, युएई व अन्य युरोपीय देशांना निर्यात केली जात आहे. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये तांदळाच्या निर्यातीत जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. भारतातून बांगलादेशात मोठ्या प्रमाणात तांदूळ निर्यात सुरू आहे. बांगलादेशने तांदळावरील आयात शुल्क ६२.५ टक्क्यांवरून २५ टक्के केल्यामुळे निर्यातवाढीस बळ मिळाले आहे. बांगलादेशला यावर्षी सुमारे पाच लाख टन बिगर बासमती तांदूळ आयात करण्याचा अंदाज केंद्र शासनाच्या कृषी मंत्रालयाने वर्तविला आहे. त्यामुळे याचा आणखी काही महिने दरावर परिणाम होणार आहे.
चौकट
असे वाढले दर
माल तीन महिन्यांपूर्वी सध्या
सोनामसुरी २६ ते २७ रु. ३२ ते ३३ रु.
मसुरी २५ ते २६ २७ ते २८
आरएनआर ३३ ते ३४ ३७ ते ३८
कोलम ४५ ते ४७ ५० ते ५२
इंद्रायणी ३० ते ४३ ३५ ते ४७
कोट
तांदळाची आवक सध्या चांगली असून, बिगर बासमती तांदळाच्या दरात वाढ झाली आहे. इंधन दरवाढीमुळेही दरात मोठी वाढ होत आहे. मे महिन्यात नवे पीक बाजारात आल्यानंतर दर पुन्हा खाली येतील. तोपर्यंत दर असेच राहतील.
- किरण माने, तांदूळ विक्रेते, सांगली