एक्स्प्रेस सुरू, मग पॅसेंजर का नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:31 AM2021-08-18T04:31:32+5:302021-08-18T04:31:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोविड काळात रेल्वेने टप्प्याटप्प्याने लांब पल्ल्याच्या काही गाड्या सुरू केल्या. आतापर्यंत बहुतांश एक्स्प्रेस सुरू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोविड काळात रेल्वेने टप्प्याटप्प्याने लांब पल्ल्याच्या काही गाड्या सुरू केल्या. आतापर्यंत बहुतांश एक्स्प्रेस सुरू झाल्या असल्या तरी एकही पॅसेंजर गाडी सुरू झालेली नाही. प्रवाशांना एक्स्प्रेस गाड्यांसाठी नेहमीच्या भाड्यापेक्षा कितीतरी जास्त पैसे मोजावे लागत आहेत.
मिरजेतून पॅसेंजरने कोल्हापूरला अवघ्या १५ रुपयांत जाता येते, पण सध्या एक्स्प्रेससाठी ६० रुपये मोजावे लागत आहेत. पॅसेंजर बंद ठेवून रेल्वेकडून ही लूटच सुरू आहे. कोल्हापूरसह बेळगाव, पंढरपूर, पुणे मार्गांवर पॅसेंजर गाड्या भरभरून धावतात, पण दीड वर्षापासून एकही पॅसेंजर धावलेली नाही.
बॉक्स
या पॅसेंजर गाड्या अद्याप यार्डातच
मिरजेतून कोल्हापूर, बेळगाव, पंढरपूर या पॅसेंजर बंद आहेत. कोल्हापूर-पुणे, सातारा-कोल्हापूर या गाड्या बंद असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. सकाळी १० वाजता मिरजेतून सुटणारी बेळगाव पॅसेंजर फुल्ल असते. सकाळी साडेआठची सातारा-कोल्हापूर पॅसेंजर तर अडीच हजारांहून अधिक प्रवाशांची लाईफलाईन आहे, तीदेखील बंदच आहे.
बॉक्स
सध्या फक्त एक्स्प्रेस गाड्या
मिरज-बंगळुरू राणी चेन्नम्मा, कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया, यशवंतपूर-गांधीधाम, यशवंतपूर-अहमदाबाद, यशवंतपूर-अजमेर, हुबळी-दादर, गोवा-निजामुद्दीन, कोल्हापूर-धनबाद, कोल्हापूर मुंबई महालक्ष्मी व कोयना एक्स्प्रेस, कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस या गाड्या सध्या धावताहेत.
बॉक्स
पॅसेंजर गाड्यांनी काय घोडे मारलेय?
एक्स्प्रेस गाड्या धावत असतील तर पॅसेंजर गाड्यांनी काय घोडे मारलेय? असा सवाल प्रवासी उपस्थित करत आहेत. सध्या सर्वत्र अनलॉक झाल्याने प्रवास करणाऱ्यांना पॅसेेंजरची गरज जाणवत आहे.
कोट
मुंबईत लोकल सुरू झाली, मग पॅसेंजर का बंद?
कोरोना काळात बंद केलेल्या पॅसेंजर आता सुरू करायला हव्यात. मुंबईत लोकल सुरू होत असेल तर सांगली, कोल्हापुरात पॅसेंजर गाड्या बंद ठेवणे योग्य नाही. दररोज दहा हजारांहून अधिक प्रवासी सांगली-मिरजेतून पसेंजरने प्रवास करतात.
- उमेश शहा, सांगली रेल डेव्हलपमेंट ग्रुप
पॅसेंजर गाड्या सुरू होण्यासाठी रेल्वेने निर्णय घेतला पाहिजे. कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांसाठी पॅसेंजर खुली करता येईल. जनरल तिकीट विक्रीही सुरू केली पाहिजे. बंदमुळे प्रवासी आणि रेल्वे या दोहोंचे नुकसान होत आहे.
- करण शहा, सांगली रेल डेव्हलपमेंट ग्रुप
पॅसेंजर गाड्या सुरू करण्याविषयी कोणताही निर्णय झालेला नाही. सध्या सर्वच एक्स्प्रेस गाड्या सुरू झाल्या आहेत. पॅसेंजरबाबत निर्णय होताच त्यादेखील सुरू होतील. प्रवाशांची मागणी असली तरी कोरोनास्थितीमुळे विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल.
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे