बेळगावी-मिरज विशेष पूर रेल्वे साताऱ्यापर्यंत वाढवा

By अविनाश कोळी | Published: July 31, 2024 04:29 PM2024-07-31T16:29:44+5:302024-07-31T16:30:03+5:30

रेल्वे प्रवासी सल्लागार समिती सदस्यांची मागणी

Extend Belagavi Miraj Special Flood Railway to Satara | बेळगावी-मिरज विशेष पूर रेल्वे साताऱ्यापर्यंत वाढवा

बेळगावी-मिरज विशेष पूर रेल्वे साताऱ्यापर्यंत वाढवा

सांगली : सांगली व सातारा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याने रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. अशा स्थितीत बेळगावी ते मिरज या मार्गावर सुरु केलेल्या पूर विशेष रेल्वेचा सातारा स्थानकापर्यंत विस्तार करावा, अशी मागणी विभागीय रेल्वे प्रवासी समिती (डीआरयूसीसी) सदस्यांनी केली आहे.

समितीच्या सदस्या नम्रता तिवारी यांनी मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापक इंदुराणी दुबे यांना याबाबत निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, सांगली, कराड, भिलवडी, ताकारी, किर्लोस्करवाडी, सातारा याठिकाणी मुसळधार पावसामुळे कृष्णा, वारणा, कोयना, पंचगंगा, येरळा या नद्या ओसंडून वाहत आहेत. सांगलीतील कृष्णा नदीची पाणीपातळी ३९ फूट तर मिरजेत ५० फूट आहे. सातारा, कराडपासून ५० कि.मी. अंतरावर असलेल्या कोयना धरणातून आणि सांगली जिल्ह्यातील चांदोली धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सांगली सातारा जिल्ह्यातील बरेच पूल व रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

सांगली विभागातील ८२५ एसटी बसेस रद्द केल्या आहेत. सातारा व कराड येथूनही अनेक एसटी बसेस रद्द केल्या आहेत. सातारा, कराड, सांगली ते कर्नाटक बसेस तसेच सांगली ते पुणे बसेस रद्द झाल्या आहेत.

दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागाने १ ऑगस्ट ते ४ ऑगस्टदरम्यान पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बेळगाव-मिरज विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. महाबळेश्वर आणि पाचगणी येथे गेलेले कर्नाटकातील पर्यटक मिरज जंक्शनपर्यंत १८० कि.मी. अंतरावर जाऊन ही विशेष गाडी पकडू शकत नाहीत. त्यासाठी सातारा ते बेळगावी थेट गाडी हवी. प्रत्येक वेळी सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, भिलवडीच्या लोकांनी मिरजेत येऊनच कर्नाटक जाणारी रेल्वे पकडावी, असा आग्रह मध्य रेल्वे करते. त्यामुळे खूप गैरसोय होत आहे.

बसेस पुरामुळे धावत नसल्याने आणि लोक अडकून पडल्यामुळे बेळगावी-मिरज पूर विशेष गाडी सातारा स्थानकापर्यंत वाढवावी. नैसर्गिक आपत्तीच्या काळात दक्षिण पश्चिम रेल्वे लोकांना मदत करत आहे. बेळगावी-सातारा विशेष रेल्वे चालवून मध्य रेल्वेने लोकांना मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Extend Belagavi Miraj Special Flood Railway to Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.