Sangli: विस्तारित ‘म्हैसाळ’च्या कामाला आठवड्यात सुरुवात, ठेकेदाराला काम सुरू करण्याचे आदेश 

By अशोक डोंबाळे | Published: July 14, 2023 06:35 PM2023-07-14T18:35:43+5:302023-07-14T18:35:58+5:30

जत पूर्वच्या वंचित ६५ गावांना मिळणार अखेर न्याय

Extended Mhaisal work to start in week, orders to contractor to start work | Sangli: विस्तारित ‘म्हैसाळ’च्या कामाला आठवड्यात सुरुवात, ठेकेदाराला काम सुरू करण्याचे आदेश 

Sangli: विस्तारित ‘म्हैसाळ’च्या कामाला आठवड्यात सुरुवात, ठेकेदाराला काम सुरू करण्याचे आदेश 

googlenewsNext

सांगली : जत तालुक्याच्या पूर्व भागातील ६५ गावांसाठी एक हजार ९२८ कोटी रुपये खर्चाच्या विस्तारित म्हैसाळ म्हणजेच जत उपसा सिंचन योजनेस राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. कामाच्या पहिल्या टप्प्याची ९८१ कोटी ६० लाख ९२ हजार रुपयांचे काम मिळविण्यात कोल्हापूरची लक्ष्मी इन्फ्रा ही कंपनी यशस्वी झाली आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारास काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. येत्या आठवड्यात प्रत्यक्षात कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

म्हैसाळ योजनेच्या पाण्याचा जत तालुक्यातील १२५ पैकी ७७ गावांना लाभ मिळत आहे. मात्र, पूर्व भागातील ६५ गावे पाण्यापासून वंचित होती. त्यांना पाणी देण्यासाठी राज्य शासनाने विस्तारित म्हैसाळ योजनेमधून ‘जत उपसा सिंचन योजना’ नावाने प्रकल्प मंजूर केला आहे. मूळ म्हैसाळ योजनेतील टप्पा क्रमांक तीन म्हणजे बेडग (ता. मिरज) येथून थेट पाणी उचलले जाणार आहे. त्यासाठी सहा टीएमसी पाण्याची तरतूद केली आहे. त्यातून ६५ गावांतील ५० हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

यासाठी शासनाने १ हजार ९२८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. टप्पा क्रमांक एक, दोन आणि तीन येथे पंपगृह, ऊर्ध्वगामी नलिका, टप्पा क्रमांक एक व दोनमधील जोड कालवे, बोगदा आदींच्या कामाची ९८१ कोटी ६० लाख ९२ हजार रुपयांच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली होती. या मोठ्या कामाची निविदा मिळविण्यात लक्ष्मी इन्फ्रा ही कंपनी यशस्वी झाली आहे. या कंपनीला जलसंपदा विभागाने काम सुरू करण्याचे आदेशही दिले आहेत. येत्या आठ दिवसांत विस्तारित म्हैसाळ म्हणजेच जत उपसा सिंचन योजनेच्या कामाला सुरुवात होणार आहे.

राजकीय घडामोडीमुळे थेट कामालाच सुरुवात

राज्यात सध्या वेगवान राजकीय घडामोडी सुरू असून त्यामुळे विस्तारित म्हैसाळ जत उपसा सिंचन योजनेच्या कामाच्या शुभारंभासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नाही. योजनेच्या कामाला जास्तीचा वेळ न लावता थेट काम सुरू करून नंतर कामाचा शुभारंभ करण्याच्या दृष्टीने जलसंपदा विभागाच्या हालचाली सुरू आहेत. ठेकेदाराला काम सुरू करण्याचे आदेशही जलसंपदा विभागाकडून दिले आहेत.

Web Title: Extended Mhaisal work to start in week, orders to contractor to start work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.