बीसीए, बीबीएम टीईटीसाठी ८ जुलैपर्यंत मुदतवाढ
By संतोष भिसे | Published: July 4, 2024 04:14 PM2024-07-04T16:14:43+5:302024-07-04T16:15:09+5:30
यापूर्वी प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त टीईटी देण्याची सक्ती नाही
सांगली : बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएस या शिक्षणक्रमांच्या अतिरिक्त टीईटीला ८ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याबाबतचे प्रकटन सीईटी सेलने बुधवारी जारी केले. यापूर्वी ही मुदत बुधवारपर्यंत (दि. ३) होती. मुदतवाढीमुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
२९ मे रोजीची टीईटी देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही अतिरिक्त प्रवेश परीक्षा होत आहे. २९ जून ते ३ जुलैअखेर परीक्षेसाठी नोंदणी करण्याची मुदत होती. या कालावधीत हजारो विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. ही मुदत वाढविण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. तिची दखल घेत नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली आहे. ८ जुलैपर्यंत सीईटीच्या पोर्टलवर विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी नोंदणी करता येईल. त्यानंतर मात्र मुदतवाढ मिळणार नसल्याचे सेलने स्पष्ट केले आहे.
परीक्षेचे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाणार आहे. यापूर्वी प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त टीईटी देण्याची सक्ती नाही. यापूर्वीच्या परीक्षेचे त्यांचे गुण प्रवेशासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. मात्र गुणवाढीसाठी ते स्वच्छेने पुन्हा परीक्षा देऊ शकतात. दोन्ही परीक्षांपैकी सर्वाधिक गुण प्रवेशावेळी ते सादर करु शकतात.