विस्तारिकरणाचा प्रश्न ऐरणीवर...

By admin | Published: November 2, 2014 10:11 PM2014-11-02T22:11:57+5:302014-11-02T23:29:42+5:30

सागरेश्वर अभयारण्य : हरणांच्या जीवितास धोका

Extension question to an array ... | विस्तारिकरणाचा प्रश्न ऐरणीवर...

विस्तारिकरणाचा प्रश्न ऐरणीवर...

Next

प्रताप महाडिक - कडेगाव  -यशवंतराव चव्हाण वन्यजीव सागरेश्वर अभयारण्यातील वन्य जीव धोक्यात आहे. अभयारण्य बंदिस्त नसल्यामुळे मोकाट हरणांचा कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू होत आहे. हरणांच्या मृत्यूची मालिका अखंडपणे सुरू आहे. याशिवाय येथील मोकाट हरणे शेतकऱ्यांची पिके फस्त करीत आहेत. यावर कायमस्वरुपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. सागरेश्वर अभयारण्य ते चौरंगीनाथ निसर्ग पर्यटन केंद्रापर्यंतचा वनविभागाच्या हद्दीतील प्रदेश सागरेश्वर अभयारण्यात समाविष्ट करून संपूर्ण अभयारण्य परिसराभोवती तारेचे कुंपण करून हरणे बंदिस्त करणे गरजेचे आहे.
सागरेश्वर अभयारण्य परिसरात सध्या मृत्यू होणाऱ्या हरणांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यास जबाबदार कोण? हा प्रश्न अधांतरीतच आहे. तसेच मोकाट हरणांमुळे परिसरातील शेतीचे नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. वनविभागाकडून दरवर्षी लाखो रुपयांची पीक नुकसानभरपाई शेतकऱ्यांना दिली जाते. हरणे बंदिस्त केल्यावर ही पीक नुकसानभरपाई द्यावी लागणार नाही शिवाय कुत्र्यांच्या हल्ल्यात हरणांचा मृत्यू होणार नाही.
अन्न व पाण्याच्या शोधात बाहेर पडलेली हरणे रानोमाळ पिकांची नासाडी करतात. तरीही गांधारीची भूमिका घेतलेले शासन गप्पच आहे. सध्या या हरणांना व वन्यप्राण्यांना बंदिस्त करण्याचा खर्च जास्त आहे.
माजी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी अभयारण्याच्या सभोवती ३५ किमी लांबीचे कुंपण घालण्यासाठी कोट्यवधींचा निधी गेल्या दोन वर्षांत टप्प्या-टप्प्याने दिला. ३५ किमीपैकी २७ किमी लांबीचे कुंपण झाले परंतु उर्वरित ७ किमी अंतरावरील मोकळ्या जागेतून हरणे बाहेर पडतात. बाहेर पडलेल्या हरणांवर कुत्र्यांचा हल्ला होत आहे. यात हरणांचा मृत्यू होत आहे. मोकाट हरणे पिकांची नासाडी करीत आहेत. शासन शेतकऱ्यांना पिकांची नुकसानभरपाई देते, तिही तुटपुंजी त्यामुळे मोकाट हरणांमुळे शेतकरी हतबल झाला आहे.
सांगली जिल्ह्यातील वाळवा, पलूस, कडेगाव या तीन तालुक्यांत हे अभयारण्य विस्तारले आहे. चौरंगीनाथ निसर्ग पर्यटन केंद्रापर्यंतचे वनविभागाचे क्षेत्र यात घेतल्यास सांगली, सातारा जिल्ह्यात अभयारण्याचा विस्तार होईल. यासाठी माजी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्यासह सत्ताधारी भाजपमधील नेत्यांनी प्रयत्न करावा व शेती, शेतकरी, प्राणी यांचे होणारे नुकसान टाळावे.

अभयारण्य विस्तारिकरणाचे फायदे
मोकाट हरणे बंदिस्त होतील
पिकांचे नुकसान टळेल
कुत्र्यांच्या हल्ल्याचा धोका नाही
डोंगरमाथ्यावर वनसंपदा वाढेल
सागरेश्वर ते चौरंगीनाथ परिसर घनदाट जंगलांनी हिरवागार होईल
पर्यटकांची संख्या वाढेल.

Web Title: Extension question to an array ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.