एलईडी पथदिव्यांच्या निविदेला मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:21 AM2021-05-29T04:21:47+5:302021-05-29T04:21:47+5:30
सांगली : महापालिकेच्या ६० कोटी रुपयांच्या एलईडी पथदिवे निविदेला शुक्रवारी तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता १५ जूनरोजी ...
सांगली : महापालिकेच्या ६० कोटी रुपयांच्या एलईडी पथदिवे निविदेला शुक्रवारी तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता १५ जूनरोजी निविदा उघडल्या जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.
महापालिका क्षेत्रात ३२ हजार पथदिवे आहेत. राज्य शासनाने ईईएसएल या खासगी कंपनीला एलईडी पथदिवे बसविण्याचा ठेका दिला होता. मात्र कंपनीच्या अटी व शर्तींमुळे महापालिकेला पंधरा ते वीस कोटी रुपयांचा बोजा सहन करावा लागणार होता. त्यामुळे ईईएसएल कंपनीपेक्षा कमी दराने एलईडी दिवे बसवून देणार्याला ठेका देण्याचा ठराव महासभेने केला. त्यास नगरविकासने मान्यता दिली. त्यानुसार निविदा मागवल्या आहेत. महापालिकेच्या ‘एलईडी पथदिवे’ प्रकल्पासाठी २६ मार्च रोजी निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. निविदा भरण्याची अंतिम तारीख २२ एप्रिल होती. या मुदतीत केवळ दोनच निविदा दाखल झाल्या. त्यानंतर प्रशासनाने दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली. या कालावधीत निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. तीन निविदा आल्याशिवाय त्या उघडता येत नसल्याने प्रशासनाने शुक्रवारी तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. आता १४ जूनपर्यंत निविदा भरण्यास मुदत असून १५ रोजी निविदा उघडली जाणार आहे. एलईडी दिवे बसविल्यानंतर वीज बिलात होणारी बचत रक्कम ठेकेदाराला दिली जाणार आहे. या बचत रकमेतील ५ टक्के रक्कम ठेकेदाराकडून महापालिकेला मिळणार आहे.