Sangli News: मणेराजुरीतील द्राक्ष उत्पादकांना ४७ लाखांचा गंडा, उत्तर प्रदेशचे संशयित पसार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 06:38 PM2023-02-09T18:38:36+5:302023-02-09T18:39:19+5:30
सुरुवातीला रोख रक्कम देऊन द्राक्ष उत्पादकांचा विश्वास संपादन केला
तासगाव : मणेराजुरी (ता. तासगाव) येथील द्राक्ष बागायतदारांचा विश्वास मिळवून, त्यांच्याकडून द्राक्ष खरेदी करून, उत्तर प्रदेशमधील तीन व्यापाऱ्यांनी अवघ्या पंधरा दिवसांत २० द्राक्ष उत्पादकांना ४७ लाख रुपयांचा गंडा घातला. हे व्यापारी ‘नॉट रिचेबल’ झाल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी मंगळवारी रात्री पोलिसांत धाव घेतली. दरम्यान, ही द्राक्षे विक्रीसाठी बाजारात नेत असतानाच चार वाहने शेतकऱ्यांनी ताब्यात घेतली.
उत्तर प्रदेशमधील तीन व्यापारी द्राक्ष खरेदीसाठी तासगाव परिसरात १५ दिवसांपूर्वी दाखल झाले होते. तासगाव येथील एजंटाला हाताशी धरून त्यांनी आरवडे येथे राहण्यासाठी जागा मिळवली. त्यानंतर मणेराजुरी परिसरात द्राक्ष हंगामाला सुरुवात झाल्यानंतर २३ जानेवारीपासून खरेदीला सुरुवात केली.
सुरुवातीला रोख रक्कम देऊन द्राक्ष उत्पादकांचा विश्वास संपादन केला. रोखीने रक्कम मिळत असल्यामुळे मणेराजुरीतील शेतकऱ्यांनी संबंधित व्यापाऱ्यांना द्राक्षांची विक्री केली. खरेदी वाढल्यानंतर काही रक्कम देऊन, तांत्रिक कारणे सांगून उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ सुरू केली. पंधरा दिवसांत २० शेतकऱ्यांची द्राक्ष खरेदी करून, त्यांची ४७ लाख रुपयांची देणी बाकी ठेवली.
बुधवारी (दि. १) रात्री संबंधित व्यापाऱ्यांनी आरवडे येथील स्वतःचा बिस्तारा गुंडाळून पोबारा केला. गुरुवार, दि. २ पासून त्यांचा मोबाईल ‘नॉट रिचेबल’ लागत असल्याने या व्यापाऱ्यांनी गंडा घातल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर मंगळवारी (दि. ७) शेतकऱ्यांनी तासगाव पोलिस ठाण्यात धाव घेतली. बुधवारी रात्री उशिरापर्यंत तासगाव पोलिस ठाण्यात याबाबत कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. मात्र, तासगाव येथील एजंटाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
मालेगाव, लखनौजवळ चार वाहनांतील माल ताब्यात
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर काही शेतकऱ्यांनी तातडीने, ज्या ट्रान्स्पोर्ट कंपनीच्या वाहनांतून व्यापाऱ्यांनी द्राक्षे नेली होती, त्या कंपनीशी संपर्क साधून वाटेतच वाहने ताब्यात घेण्याची व्यवस्था केली. त्यानुसार मालेगावजवळ दोन, तर लखनौजवळ दोन वाहनांमधील दहा हजार पेट्या ताब्यात घेऊन विक्री करण्यासाठी यंत्रणा लावली.
पोलिसांच्या आवाहनाला केराची टोपली
काही दिवसांपूर्वी तासगाव पोलिस ठाण्यात व्यापारी, एजंट, शेतकऱ्यांची बैठक घेऊन पोलिस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी व्यापाऱ्यांचे ओळखपत्र, बँकेच्या कागदपत्रांची पडताळणी करूनच द्राक्षांची विक्री करण्याबाबत आवाहन केले होते. मात्र, या आवाहनाला उत्पादकांनी केराची टोपली दाखवली. फसवणूक झालेल्या एकाही शेतकऱ्याकडे संबंधित व्यापाऱ्याचे ओळखपत्र किंवा पूर्ण माहिती नसल्याचे निष्पन्न झाले आहे.
या शेतकऱ्यांची झाली फसवणूक
फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांमध्ये पांडुरंग महादेव जमदाडे, संतोष बबन जमदाडे, सुभाष रामचंद्र एरंडोले, परशराम वसंत एरंडोले, परशराम धाेंडीराम वाघमारे, शशिकांत शिवाजी कलढाेणे, अनिल बबन चव्हाण, वसंत पंडित लांडगे, रवींद्र नामदेव जमदाडे, गोविंद बाबा भोसले, उदय रघुनाथ भोसले, विजय ऊर्फ कुंडलिक लक्ष्मण लांडगे, रमेश अर्जुन लांडगे, अमोल नारायण माने, प्रकाश तुकाराम कलढोणे, सदाशिव पांडुरंग कलढोणे, विनायक कृष्णराव कांबळे, मौला जलालुद्दीन मुजावर, संदीप हनुमंत बेडगे व राम प्रभाकर पवार यांचा समावेश आहे.