कोरोना महामारीवर लिंबू, संत्री, मोसंबीचा उतारा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:27 AM2021-04-08T04:27:06+5:302021-04-08T04:27:06+5:30
सांगली : कोरोना काळात शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी नागरिक लिंबू, संत्री, मोसंबी फळांना प्राधान्य देत आहेत. विष्णुअण्णा फळ मार्केटला ...
सांगली : कोरोना काळात शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी नागरिक लिंबू, संत्री, मोसंबी फळांना प्राधान्य देत आहेत. विष्णुअण्णा फळ मार्केटला आवकच कमी झाल्यामुळे जादा किंमत मोजूनही सांगली शहरात संत्रा, मोसंबी मिळत नसल्याचे चित्र आहे. ठोक बाजारातही फळे मिळत् नसल्याने मोजक्याच व्यापाऱ्यांकडे फळे दिसून येत आहेत.
जिल्ह्यात कोरोना आजाराचे रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे प्रत्येकजण आरोग्याची काळजी घेत आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी विविध फळांचे सेवन करीत असल्याने बाजारपेठेत फळांना मागणी वाढली आहे. त्यात लिंबू, संत्री, मोसंबी या फळांना तर मोठी मागणी वाढली आहे. लिंबू या फळांमध्ये व्हीटॅमिन सी असल्यामुळे शरीराचे कार्य टिकून ठेवण्यास व रोगप्रतिकार शक्ती नियंत्रित राहण्यास मदत होते. शिवाय पचनक्रियाही मजबूत होण्यासह रक्त शुध्द होण्यास मदत होते. संत्र हेसुद्धा शक्तीवर्धक फळ असून, या फळाचे सेवन केल्यास शरीर व मन थंड राहाते. थकवा, तणाव दूर होण्यास मदत होते. मोसंबी फळातही ए, बी, सी हे जीवनसत्व असल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत.
चौकट
दुपटीने वाढले दर
मोसंबीचे दर मागील महिन्याच्या तुलनेत दुपट वाढले आहेत. मागील महिन्यात ७० ते ८० रुपये किलोने मिळणारी मोसंबी आता ११० ते १२० रुपये मोजूनही मिळत नाहीत. संत्र्याचे दरही दुप्पट वाढले आहेत, अशी प्रतिक्रिया फळ विक्रेते अशोक खांडेकर यांनी दिली.
चौकट
संत्रा आयात, मोसंबी, नांदेड, औरंगाबाद, बेळगावमधून
उन्हाळ्याच्या हंगामात देशांतर्गत संत्र्याचे उत्पादन फार कमी असल्यामुळे अमेरिका, तुर्की, न्युझीलंड येथून मुंबई येथे संत्र्याची आयात सुरु आहे. मुंबईहून सांगलीतील व्यापारी संत्रा घेऊन येत आहेत. मोसंबी मात्र औरंगाबाद, नांदेड, बीड, बेळगाव येथून येत आहेत. लिंबूची प्रचंड टंचाई असल्यामुळे दहा रुपयांना दोनच लिंबूची विक्री होत आहे. लॉकडाऊनमुळे विजापूर, पुणे येथून लिंबूची आवक कमी आहे, अशी प्रतिक्रिया विष्णुअण्णा फळ मार्केटमधील व्यापारी सागर मदने यांनी दिली.
चौकट
सांगलीतील फळांचे प्रतिकिलो दर
जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल
लिंबू ४० ५० ७० १२५
मोसंबी ५० ७५ ८० १२०
संत्री ४० ६० ९० १४०
चौकट
इम्युनिटी वाढते ! मी फळे खातो, तुम्हीही खा !!
कोट
शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी मदत होत असल्याने मी नेहमी संत्रा, मोसंबी ही फळे खातो. सध्या ही फळे मिळणेच दुरापस्त झाले आहेत. दररोजच्या जेवणात लिंबू असतेच.
- नीलेश देशमुख, सांगली.
कोट
मार्च महिन्यापर्यंत संत्रा, मोसंबी ही फळे बाजारात उपलब्ध होत असल्याने खात होतो. आता मात्र फळांच्या किमती दुप्पट वाढल्या असल्या तरी फळेच उपलब्ध होत नाहीत. लिंबू मात्र आवश्य आहारात घेतो.
- धनंजय जाधव, सांगली.
चौकट
तज्ज्ञ काय म्हणतात...
कोट
संत्री, मोसंबी, लिंबू या फळात व्हिटॅमिन सी असते. तसेच ही फळे सेवन केल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. कोरोना काळात शरीराची रोगप्रतिकार शक्ती टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे.
- डॉ. विद्या जाधव, स्त्रीरोगतज्ज्ञ, सांगली.
कोट
संत्री, मोसंबी, लिंबू ही फळे शक्तीवर्धक फळे आहेत. सध्या कोरोनाचे वाढते रूग्ण पाहता या फळांचे सेवन करणे चांगले आहे. यात व्हिटॅमिन सी असल्याने शरीरासाठी फायदेशीर ठरते.
- डॉ. विवेक पाटील, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी.