वाढता वाढेना साखर कारखान्यांचा उतारा!
By admin | Published: December 27, 2015 12:09 AM2015-12-27T00:09:45+5:302015-12-27T00:09:45+5:30
जिल्ह्यातील चित्र : आठ कारखान्यांचा उतारा ११ टक्के, तर सात ठिकाणी केवळ साडेआठ ते दहा टक्केच उतारा
अशोक डोंबाळे ल्ल सांगली
जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या उताऱ्यात दोन वर्षांत घट झाली आहे. सध्या थंडीचा महिना असून, उताऱ्यात वाढ होण्याऐवजी घट दिसून येत आहे. दुष्काळी भागातील कारखान्यांना कार्यक्षेत्रात ऊस उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांचा उतारा कमी राहतो. पण, ऊस पट्ट्यातील कारखान्यांचा उतारा घटत असल्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांचा आर्थिक फटका बसत आहे.
जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा २०१३-१४ मध्ये सरासरी १२.६६ टक्के उतारा होता. १६ साखर कारखान्यांनी आतापर्यंत २५ लाखटन उसाचे गाळप करून तीस लाखांहून अधिक क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. दोन महिन्यात सरासरी १०.८९ टक्के उतारा मिळाला आहे. वाळव्याचा हुतात्मा, राजारामबापू (साखराळे व वाटेगाव शाखा), कारंदवाडीचा सर्वोदय, कुंडलचा क्रांती, वांगीचा सोनहिरा या कारखान्यांचा साडेअकरा टक्क्यावर साखर उतारा आहे, तर सर्वाधिक कमी साखर उतारा आटपाडीच्या माणगंगा कारखान्याचा आहे. त्यांचा उतारा केवळ ८.७७ टक्के आहे. सांगलीच्या वसंतदादा कारखान्याचाही नेहमीपेक्षा कमी उतारा असल्याचे दिसत आहे. शिराळ्याच्या ‘विश्वास’चा सरासरी साखर उतारा १३ टक्केपर्यंत असतो. परंतु, यावर्षी १३ डिसेंबरचा साखर उतारा १०.२७ टक्के आहे. कवठेमहांकाळच्या महांकाली, जतच्या डफळे कारखान्याचा उतारा दहा टक्केपेक्षा कमीच आहे. सध्या कडाक्याची थंडी असल्यामुळे उतारा आतातरी वाढणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. उतारा वाढला नाही तर, शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. कारण साखर उताऱ्यावरच एफआरपी (किमान आधारभूत किंमत) ठरविली जात आहे. उतारा वाढला तरच शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळणार आहे. तो घटला तर शेतकऱ्यांना कमी दरावर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे.