घोरपडे-खाडेंमध्ये टोकाचा संघर्ष

By admin | Published: October 5, 2014 09:43 PM2014-10-05T21:43:56+5:302014-10-05T23:09:13+5:30

कार्यकर्त्यांचा सवतासुभा : नाराजीचा मिरजेत फटका

Extreme conflict in Ghorpade-Khaden | घोरपडे-खाडेंमध्ये टोकाचा संघर्ष

घोरपडे-खाडेंमध्ये टोकाचा संघर्ष

Next

मिरज : माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तरी, मिरज पूर्व भागातील घोरपडे समर्थक कार्यकर्ते राष्ट्रवादीचा प्रचार करीत असल्याने, घोरपडे व आमदार सुरेश खाडे यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. घोरपडे समर्थक अद्याप भाजपच्या प्रचारात सहभागी नसल्याने खाडे अस्वस्थ आहेत.
मिरज पूर्व भागातील २८ गावांत माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या समर्थकांचा गट आहे. विकास आघाडीच्या माध्यमातून कार्यरत असलेला गट घोरपडे यांच्यासोबत राष्ट्रवादीत गेला. गत विधानसभा व लोकसभा निवडणुकीत घोरपडे समर्थक गटाने भाजपला उघड मदत केल्याने भाजपला चांगलाच फायदा झाला होता. खासदार संजय पाटील व घोरपडे यांचे सख्य असल्याने घोरपडे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून गृहमंत्र्यांविरोधात भाजपची उमेदवारीही मिळाली. मात्र घोरपडे यांच्या पक्षप्रवेशामुळे मिरज विधानसभेसाठी भाजपला फायदा होईल, ही भाजप नेत्यांची अपेक्षा फोल ठरली आहे. घोरपडे समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश न करता, त्यांचा राष्ट्रवादी गट शाबूत ठेवला आहे. त्यांचे समर्थक राष्ट्रवादीच्या प्रचारात सहभागी असल्याने मिरजेत भाजपला फटका बसण्याची भीती आहे. युती तुटल्याने शिवसेना उमेदवारामुळे मत विभागणीचा धोका असल्याने मिरज पूर्व भागातील गावांत घोरपडे समर्थकांच्या मदतीची सध्या भाजपला मोठी गरज आहे. पूर्व भागातील गावांत प्रत्येक निवडणुकीत घोरपडे समर्थक भाजपचे काम करीत असल्याने तेथे भाजपचे पक्षसंघटन नगण्य आहे. घोरपडे समर्थकांच्या मदतीशिवाय पूर्व भागातील मताधिक्य मिळविणे अवघड होणार आहे.
भाजपअंतर्गत नवीन व जुने असे परस्परांवर कुरघोड्यांचे राजकारण सुरू झाल्याने घोरपडे समर्थक भाजपच्या प्रचारात सहभागी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. (वार्ताहर)

खाडेंची खासदारांकडे तक्रार
घोरपडे यांच्या खेळीमुळे अस्वस्थ झालेल्या आ. खाडे यांनी याबाबत खासदारांकडे तक्रार केल्याची माहिती मिळाली. खासदारांच्या मध्यस्थीनंतर घोरपडे व आ. खाडे यांची बैठक होऊन राष्ट्रवादी कार्यकर्ते भाजपचाच प्रचार करतील, अशी खात्री घोरपडे यांनी आ. खाडे यांना दिली. मात्र त्यानंतरही कार्यकर्ते अद्याप भाजपच्या प्रचारापासून दूरच असल्याने घोरपडे व आ. खाडे यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे.

Web Title: Extreme conflict in Ghorpade-Khaden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.