मिरवणुकांमधली ‘लेझर’मुळे ८० तरुणांच्या डोळ्यांना इजा, सांगली जिल्हा ऑप्थॉल्मॉजिस्ट संघटनेने केली बंदीची मागणी
By संतोष भिसे | Published: August 14, 2024 04:44 PM2024-08-14T16:44:09+5:302024-08-14T16:44:44+5:30
संतोष भिसे सांगली : विविध उत्सवांतील मिरवणुकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लेसर किरणांमुळे डोळ्यांचे पडदे फाटण्याचे प्रमाण वाढले आहे. याविरोधात महाराष्ट्रभरातील ...
संतोष भिसे
सांगली : विविध उत्सवांतील मिरवणुकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लेसर किरणांमुळे डोळ्यांचे पडदे फाटण्याचे प्रमाण वाढले आहे. याविरोधात महाराष्ट्रभरातील नेत्रविकारतज्ज्ञांनी आवाज उठवायला सुरूवात केली आहे. पहिल्या टप्प्यात सांगली जिल्हा ऑप्थॉल्मॉजिस्ट संघटनेने लेसरला विरोधाची भूमिका घेतली असून, कोल्हापुरातूनही शासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे.
सांगलीच्या संघटनेने शनिवारी पालकमंत्री सुरेश खाडे यांना निवेदन देऊन लेसरवर बंदीची मागणी केली. संघटनेने सांगितले की, लेसरच्या माऱ्यामुळे डोळ्यांच्या पडद्याला (नेत्रपटल) छिद्र पडलेले रुग्ण मोठ्या संख्येने उपचारांसाठी येत आहेत. गेल्यावर्षी गणेशोत्सव आणि दसऱ्या दरम्यानच्या विविध मिरवणुकांदरम्यान लेसरचा वापर मोठ्या प्रमाणात झाला होता. त्यानंतरच्या महिन्याभरात जिल्हाभरातील नेत्रविकारतज्ज्ञांकडे डोळ्यांच्या उपचारांसाठी गर्दी होऊ लागली. लेसरमुळे ८० तरुणांच्या डोळ्यांच्या पडद्याला इजा झाल्याची नोंद संघटनेने केली आहे.
छिद्र पडते, भरून येत नाही
मिरवणुकीत वापरल्या जाणाऱ्या रंगीबेरंगी लेसरमध्ये उष्णतेची तीव्रता अधिक असते. बुबुळांवर १० सेकंदांपेक्षा अधिक वेळ लेसरचा किरण स्थिर राहिल्यास डोळ्यांच्या पडद्याला इजा होते. प्रसंगी छिद्र पडते. त्यावर शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसतो. शस्त्रक्रियेनंतरही कमाल ७५ टक्क्यांपर्यंतच दृष्टी परत मिळते. सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील एका कर्मचाऱ्याच्या मुलाच्या नेत्रपटलाला पडलेल्या छिद्रावर मिरजेत अजूनही उपचार सुरू आहेत.
नाशिक पोलिसांनी जाहीर केले निर्बंध
नाशिकमध्ये नेत्रतज्ज्ञांनी लेसरच्या दुष्परिणामांचे गांभीर्य स्पष्ट केल्यानंतर तेथील पोलिसांनी यंदाच्या गणेशोत्सवातील मिरवणुकांत लेसरच्या वापरावर निर्बंध जाहीर केले आहेत. तोच निर्णय सांगली, कोल्हापूरसह राज्यभरात लागू व्हावा, यासाठी नेत्रतज्ज्ञांचा पाठपुरावा सुरू आहे.
लेसरमुळे नेत्रपटलांना इजा झालेले रुग्ण मोठ्या संख्येने आमच्याकडे उपचारांसाठी येत आहेत. यामध्ये २० ते ३० वर्षीय तरुणांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या विघातक लेसर किरणांचा मिरवणुकांत वापर बंद व्हावा, असे आमचे प्रयत्न आहेत. पोलिस अधीक्षकांनाही लवकरच निवेदन देणार आहोत. - डॉ. विद्यासागर चौगुले, अध्यक्ष, सांगली जिल्हा ऑप्थॉल्मॉजिस्ट असोसिएशन