साखरसम्राटांचा अनुदानावरही डोळा
By admin | Published: October 11, 2015 11:20 PM2015-10-11T23:20:21+5:302015-10-12T00:36:51+5:30
राजू शेट्टी : संघटना कारखानदारांचा डाव उधळणार
येळापूर : केंद्र सरकार साखर उद्योगाच्या विरोधात निर्णय घेत आहे, शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे, असे बिनबुडाचे आरोप करण्याचा अधिकार काँग्रेसवाल्यांना नाही. काँग्रेस पक्षाच्या हयातीत साखर उद्योगाला अनुदान दिलेले नाही. आजपर्यंतच्या इतिहासात एनडीए सरकारनेच हा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होऊ लागले आहे. मिळणाऱ्या अनुदानावरही साखरसम्राट डल्ला मारण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र डल्ला मारण्याचा हा डाव उधळून टाकणार असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा. राजू शेट्टी यांनी केले.एफआरपी एकरकमी मिळावी, यासाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चासंदर्भात सागाव (ता. शिराळा) येथील मारुती मंदिरामध्ये आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जि. प. सदस्य रणधीर नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
खा. शेट्टी म्हणाले, काँग्रेसवाले लबाड आहेत. अपवाद एकदा घेतला होता, मात्र त्यावेळी काँग्रेसवाल्यांच्या दुर्दैवाने अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार होते. त्यावेळीही १० टक्के इथेनॉल मिक्स करण्याचा निर्णय घेतला गेला होता. मात्र नंतर काँग्रेसची सत्ता आल्यानंतर तो निर्णय रद्द केला. कारण त्यांना इथेनॉलमध्ये रस नव्हता, तर दारू करण्यामध्ये रस होता. दर नियंत्रण अध्यादेश १९६६ नुसार एकरकमी एफआरपी देणे बंधनकारक आहे. त्याचे तुकडे पाडून देणार नसल्याचा इशारा देत शेट्टी म्हणाले, जो कारखाना ते देणार नाही,त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यास केंद्र व राज्य सरकारला भाग पाडण्यासाठी एक लाख शेतकऱ्यांचे अर्ज कोल्हापूर येथे साखर संचालक यांना भव्य मोर्चाद्वारे देणार आहे व हा सूर्य आणि हा जयद्रथ हे दाखवून देणार आहे. तेथून पुढे आंदोलनाला सुरुवात करणार आहे. जोपर्यंत निर्णय घेत नाही, तोपर्यंत सरकारला घाम फोडायला लावणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी रणधीर नाईक, सांगली जिल्हाध्यक्ष विलासराव देशमुख, तालुकाध्यक्ष राम पाटील, पी. के . पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
या बैठकीस तालुका उपाध्यक्ष रवींद्र पाटील, अशोकराव दिवे, शिवलिंग शेटे, चंद्रकांत पाटील, संग्राम पवार, बाबा परीट, उद्धव पाटील, किरण गायकवाड, गिरीश पवार, भीमा शंकर, दादासाहेब पाटील, शंकर घोलप, कृष्णा पवार आदी उपस्थित होते. प्रास्ताविक अशोकराव दिवे यांनी केले. आभार मानसिंग पाटील यांनी मानले. (वार्ताहर)
शासनाच्या इथेनॉलचा निर्णयाचे स्वागत
साखर उद्योगाबाबत एनडीए सरकारने घेतलेले निर्णय चुकलेले नाहीत. त्यांनी योग्यवेळी साखर निर्यातीचा, तसेच १० टक्के इथेनॉल मिसळण्याचा घेतलेला निर्णय आदर्शवत आहे. सरकारलाही निर्णय घ्यायला आम्ही भाग पाडले आहे. हा निर्णय आमच्या पाठपुराव्यामुळे व अट्टाहासामुळे घेतला आहे. याच्या पाठीमागे शेतकऱ्यांचा पाठिंबा असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले.