गुन्ह्यांच्या तपासाला गती देणार आय बाईक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 03:50 PM2020-02-22T15:50:15+5:302020-02-22T15:51:09+5:30

सांगली जिल्ह्यात घडणाऱ्या गुन्ह्यांची उकल जलदगतीने करण्यासाठी व दुर्गम भागात पंचनाम्यासह इतर तांत्रिक तपासासाठी यंत्रणा पोहोचण्यासाठी आता आय बाईकची मदत होणार आहे.

Eyebike will speed up crime investigation! | गुन्ह्यांच्या तपासाला गती देणार आय बाईक!

गुन्ह्यांच्या तपासाला गती देणार आय बाईक!

Next
ठळक मुद्देगुन्ह्यांच्या तपासाला गती देणार आय बाईक!जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याहस्ते लोकार्पण

सांगली : जिल्ह्यात घडणाऱ्या गुन्ह्यांची उकल जलदगतीने करण्यासाठी व दुर्गम भागात पंचनाम्यासह इतर तांत्रिक तपासासाठी यंत्रणा पोहोचण्यासाठी आता आय बाईकची मदत होणार आहे.

गंभीर गुन्ह्यातील भौतिक पुरावे तातडीने संकलित करून तपासाला गती देण्यासाठी जिल्हा पोलीस दलात सहा आय (इन्व्हेस्टिगेशन) बाईक दाखल झाल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याहस्ते या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. उपविभागीय स्तरावर असणाऱ्या या दुचाकीसोबत सर्व सुविधा असणार आहेत.

विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी जिल्ह्यात असा उपक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा व अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली आय बाईक कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील दुर्गम भागात गुन्हा घडल्यास तांत्रिक माहितीसाठी पोहोचण्यात अडचणी येत असतात. यावर प्रभावी उपाय म्हणून या उपक्रमाची मदत होणार आहे.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, दुर्गम भागातील गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी या बाईकचा उपयोग होणार आहे. चारचाकी वाहनांपेक्षा लवकर ही बाईक घटनास्थळी पोहोचणार असल्याने पंचनामा व पुराव्यांचे अधिक प्रभावी संकलन होणार आहे. ठराविक कालावधीनंतर संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.

अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले म्हणाल्या, सध्या जिल्ह्यात उपविभागीय स्तरावर सहा बाईक कार्यरत राहणार आहेत. उपविभागातील आवश्यकता असलेल्या पोलीस ठाण्यात ही सेवा असेल. बाईकसमवेत दोन प्रशिक्षित कर्मचारी असतील. त्यांच्याकडे स्वतंत्र कीट देण्यात आले आहे. त्याचा उपयोग पंचनामा करण्यात निश्चितपणे होऊ शकेल. यामुळे भविष्यात गुन्ह्याचा तपास लावण्यास गती येईल. रस्ते अपघातातील माहिती संकलनासाठीही याचा उपयोग होणार आहे.

यावेळी पोलीस उपअधीक्षक संदीपसिंह गील, संदीप कोळेकर, सहा. पोलीस निरीक्षक जी. व्ही. कांबळे, वाहतूक शाखेचे संजय क्षीरसागर यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
 

Web Title: Eyebike will speed up crime investigation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.