पदाधिकारी बदलाकडे इच्छुकांच्या नजरा
By admin | Published: July 16, 2014 11:37 PM2014-07-16T23:37:43+5:302014-07-16T23:41:20+5:30
जिल्हा परिषद : पदाधिकाऱ्यांना मुदतवाढीची शक्यता मावळली; २१ सप्टेंबरपर्यंत निवडी शक्य
सांगली : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांसह चार सभापतींचा अडीच वर्षाचा कार्यकाल २१ सप्टेंबर रोजी संपणार आहे़ या पदाधिकाऱ्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता पूर्णत: मावळली आहे़ २१ सप्टेंबरपर्यंत नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी होण्याची शक्यता आहे़ येणाऱ्या अडीच वर्षासाठी जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित असल्यामुळे हे पद गृहमंत्री आऱ आऱ पाटील गटाला मिळण्याची शक्यता आहे़ परंतु, राष्ट्रवादीमधील नाराज दिग्गज नेते भाजपमध्ये गेल्यामुळे पदाधिकारी बदलावेळी मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे़
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीकडे ३३ सदस्यसंख्या असल्यामुळे स्पष्ट बहुमत आहे़ पहिल्या अडीच वर्षाचे अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी असल्यामुळे अमरसिंह देशमुख आणि देवराज पाटील यांना सव्वा-सव्वा वर्षासाठी पद दिले होते़ विधानसभा निवडणुका आॅक्टोबर महिन्यात होणार असतील, तर आचारसंहिता सप्टेंबर महिन्यात लागण्याची शक्यता होती़ यातूनच विद्यमान जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना तीन महिन्याची मुदतवाढ मिळेल, अशी सदस्यांमध्ये चर्चा होती़
नगरपालिका नगराध्यक्षांची मुदतवाढ न्यायालयाने अवैध ठरविल्यामुळे जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्याचे धाडस राज्य शासन करणार नसल्याचे पदाधिकाऱ्यांत बोलले जात आहे़ त्यामुळे विद्यमान पदाधिकाऱ्यांचा २१ सप्टेंबर २०१४ रोजी कार्यकाल संपत असून त्यापूर्वी पदाधिकाऱ्यांच्या निवडी होणे अपेक्षित आहे २० अथवा २१ सप्टेंबरला अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडी होण्याची शक्यता आहे़
विद्यमान अध्यक्ष देवराज पाटील ग्रामविकासमंत्री जयंत पाटीलसमर्थक असल्यामुळे आगामी अध्यक्षपद गृहमंत्री आऱ आऱ पाटील गटाकडे जाण्याची शक्यता आहे़ आबा गटाच्या सावळज गटातील कल्पना सावंत, येळावीच्या स्नेहल पाटील, मणेराजुरीच्या योजना शिंदे या अध्यक्षपदाच्या प्रमुख दावेदार सदस्या आहेत़
आटपाडीचे राष्ट्रवादीचे नेते तानाजी पाटील यांच्या पत्नी मनीषा पाटील माजी आमदार अनिल बाबरसमर्थक असून, त्यांनी दावा सांगितल्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीत चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे़ (प्रतिनिधी)
४राष्ट्रवादीमधील खासदार संजय पाटील, विलासराव जगताप, माजी मंत्री अजितराव घोरपडे हे दिग्गज नेते भाजपमध्ये गेल्यामुळे त्यांची भूमिकाही पदाधिकारी बदलावेळी महत्त्वाची ठरणार आहे़ या तिन्ही नेत्यांकडे दहा ते बारा सदस्यांची संख्या असून, ते नेते आऱ आऱ पाटील यांचे कट्टर विरोधक आहेत़ पदाधिकारी बदलावेळी ते पाटील यांच्याविरोधात भूमिका घेण्याची शक्यता नाकारता येत नाही़ यातूनच अध्यक्षपदाची निवड चांगलीच गाजण्याची शक्यता आहे़
४जगताप, घोरपडे आणि संजय पाटील यांनी ठरविले तर राष्ट्रवादीतून जिल्हा परिषदेची सत्ताही जाऊ शकते़ त्यादृष्टीने तीनही नेत्यांच्या जोरदार राजकीय हालचाली सध्या चालू आहेत़ जयंत पाटील यांच्याबद्दल या नेत्यांच्या मनात ‘सॉफ्ट कॉर्नर’ असल्याने ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांची पदाधिकारी बदलावेळी निर्णायक भूमिका ठरणार आहे़