गावकऱ्यांचे डोळे पाणावले... क्रिकेट खेळताना मृत्युमुखी पडलेला अतुल 'निवडणुकीत जिंकला'
By महेश गलांडे | Published: January 19, 2021 08:29 AM2021-01-19T08:29:59+5:302021-01-19T08:31:23+5:30
निवडणूक निकालानंतर गड आला पण सिंह गेला, अशी प्रतिक्रिया अतुलच्या मित्रांनी दिली. आटपाडी येथे मेडिकल असोसिएशनतर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धेदरम्यान अतुल विष्णू पाटील (वय 35 रा. ढवळी ता.तासगांव) येथील युवकाचा तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता
सांगली/मुंबई - सांगली जिल्ह्यात ढवळी गावात क्रिकेटच्या मैदानात एक धक्कादायक घटना घडली. क्रिकेट खेळताना सरपंच अतुल पाटील यांना ग्राउंडवर हृदयविकाराचा झटका आला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे ढवळी ग्रामपंचायत निवडणुकीत अतुल उमेदवार होता. 18 जानेवारी रोजी ग्रामपंचायतीचा निकाल लागला अन् गावातील मित्र परिवाराच्या अश्रूंचा बांध फुटला. कारण, अतुलने यंदाच्या निवडणुकीत 333 मेत घेऊन सहजच विजय मिळवला होता. तर, ज्या पॅनेलकडून अतुल निवडणुकीत उभा राहिला होता, त्या पॅनेलने ढवळी ग्रामपंचायतीवर वर्चस्वही मिळवलं आहे.
निवडणूक निकालानंतर गड आला पण सिंह गेला, अशी प्रतिक्रिया अतुलच्या मित्रांनी दिली. आटपाडी येथे मेडिकल असोसिएशनतर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धेदरम्यान अतुल विष्णू पाटील (वय 35 रा. ढवळी ता.तासगांव) येथील युवकाचा तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता. अतुल हा ढवळी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उभा होता. याशिवाय अतुलने पुढाकार घेऊन उभारलेले शिवशंभू पॅनेलही 11 पैकी 10 जागांवर विजय मिळवत निवडून आले आहे. कायम गावकऱ्यांच्या सुखा-दु:खात हिरिरीने सहभाग घेणारा अतुल या सुखाच्या सर्वोच्च क्षणी गावकऱ्यांमध्ये नव्हता. त्यामुळे, विजयाचं सेलिब्रेशन करायचं की अतुल नसल्याचं दु:ख अशी भावनिक परिस्थिती गावकरी आणि मित्र परिवारावर ओढवली होती.
अतुल पाटील हा खासदार संजय पाटील समर्थक तसेच ढवळी गावचा माजी उपसरपंच होता. यंदा त्यानेच पॅनेल उभा करण्यात पुढाकार घेतला होता, म्हणून तोच सरपंच पदाचा दावेदारदेखील होता. मात्र, नियतीला हे मान्य नव्हते, निवडणूक निकालापूर्वीच अतुलचे दुर्दैवी निधन झाले. गावकऱ्यांसाठी आणि अतुलच्या मित्रपरिवारासाठी हा मोठा धक्का होता. निकालानंतर स्थानिक सोशल मीडियातूनही अतुलच्या आठवणी जागवल्या जात आहेत. अनेकांकडून गड आला पण सिंह गेला, अशीच भावना व्यक्त केली जात आहे. एकीकडे विजयामुळे आनंदाश्रू तरळले असताना दुसरीकडे, अतुलच्या नसण्याने दु:खी नयनांनी डोळेही पाणावले आहेत. गावातील ग्रामपंचायतीच्या निकालानंतर दिवसभर पॅनेलमधील लोकांनी अतुलला श्रद्धांजली वाहिली.