नगराध्यक्षपदासाठी सख्खेभाऊ आमने-सामने
By admin | Published: October 30, 2016 12:47 AM2016-10-30T00:47:01+5:302016-10-30T00:48:25+5:30
तासगावमध्ये नवीन चेहऱ्यांना पसंती : राष्ट्रवादीकडून संजय सावंत, भाजपकडून विजय सावंत
दत्ता पाटील-तासगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षाची निवड यावेळी पाच वर्षांसाठी आणि थेट जनतेतून होणार आहे. अनुसूचित जातीचे आरक्षण पडल्याने नगराध्यक्षपदाचा चेहरा कोण असेल, याची मोठी उत्सुकता होती. पालिकेच्या राजकारणात तुल्यबळ असणाऱ्या भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांकडून नवीन चेहऱ्यांना पसंती देण्यात आल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. राष्ट्रवादीकडून अॅड. संजय सावंत यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली, तर भाजपकडून राष्ट्रवादीला शह देण्यासाठी अॅड. सावंत यांचे सख्खेभाऊ डॉ. विजय सावंत यांना ऐनवेळी उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी भाऊबंदकीचा सामना रंगणार आहे.
नगराध्यक्षपदासाठी अनुसूचित जातीसाठी आरक्षण पडले. हे आरक्षण जाहीर झाल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादीतून इच्छुक असणाऱ्यांत इच्छुकांची मोठी संख्या होती. सुरुवातीला राष्ट्रवादीकडून राहुल कांबळे यांचे, तर भाजपमधून मोहन कांबळे यांचे नाव आघाडीवर होते. मात्र मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीने अॅड. संजय सावंत यांना संधी देऊन नवखा आणि उच्चशिक्षित चेहरा नगराध्यक्षपदाच्या रिंगणात आणण्यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना यश आले. शुक्रवारी अॅड. सावंत यांचा अर्ज दाखल झाला आणि शनिवारी एबी फॉर्म देऊन राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब करण्यात आले.
राष्ट्रवादीकडून उच्चशिक्षित आणि नवखा उमेदवार पुढे केल्याने भाजपच्या गोटातही चुळबूळ सुरू झाली होती. राष्ट्रवादीच्या तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी भाजपनेही फिल्डिंग लावली होती. विशेषत: खासदार संजयकाका पाटील यांनी त्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले होते. सुरुवातीला अॅड. सावंत यांच्यासाठीच भाजपकडून सापळा लावण्यात आला होता, मात्र त्यामध्ये भाजपला यश आले नाही. त्यामुळे शुक्रवारपासून अॅड. सावंत यांचे सख्खे बंधू डॉ. विजय सावंत यांना गळ टाकण्यात आला. त्यामध्ये भाजपला यश आले. शनिवारी दुपारी डॉ. सावंत यांचा अर्ज भाजपकडून दाखल करण्यात आला. भाजपचा एबी फॉर्मही डॉ. सावंत यांना देण्यात आला. राष्ट्रवादीच्या तोडीसतोड उमेदवार देऊन भाजपने नगराध्यक्षपदासाठी मोठी चुरस निर्माण केली आहे. काही दिवसांपूर्वी राजकारणी थेट कोणताही संबंध नसणारे दोघे सख्खे भाऊ दोन तुल्यबळ पक्षातून नगराध्यक्षपदाच्या आखाड्यात एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी दोन्ही पक्षात भाऊबंदकीचे राजकारण रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे, तर नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, हे मात्र येणारा काळच ठरवणार आहे. जनतेतून कोण होणार नगराध्यक्ष, याकडे तासगाव शहरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
बहुरंगी रिंगणात दुरंगी लढत
नगराध्यक्षपदासाठी तब्बल २५ उमेदवारांनी ३३ अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादीकडून अॅड. संजय सावंत, भाजपकडून डॉ. विजय सावंत, काँग्रेसकडून शिवाजी शिंंदे, शेकापकडून शिवाजी गुळवे आणि शिवसेनेकडून मिथुन कांबळे यांचे अर्ज दाखल झाले आहेत. भाजपकडून नाव आघाडीवर असलेले माजी नगरसेवक मोहन कांबळे यांचा एबी फॉर्म मिळाला नसल्याने त्यांनीही ऐनवेळी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. यासह अनेक उमेदवारांनी अपक्ष अर्ज भरुन नगराध्यक्षपदाच्या दाखल अर्जांसाठीचे रेकॉर्ड ब्रेक केले आहे. त्यामुळे तासगावात नगराध्यक्षपदासाठी बहुरंगी रिंगण तयार होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र तासगाव शहरात नगराध्यक्षपदासाठी तुल्यबळ ताकद असणारे भाजप आणि राष्ट्रवादी असे दोनच पक्ष आहेत. त्यामुळे बहुरंगी रिंगणात सावंत बंधूतच खरी दुरंगी लढत पाहायला मिळणार, हे नक्की.
‘लोकमत’चा अचूक अंदाज
राष्ट्रवादीकडून शुक्रवारी नगराध्यक्षपदासाठी अॅड. संजय सावंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. अॅड. सावंत हेच राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील, तर राष्ट्रवादीच्या या उमेदवारीला शह देण्यासाठी भाजपकडूनदेखील अॅड. सावंत यांच्या घरातीलच उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचा अंदाज ‘लोकमत’मधून व्यक्त करण्यात आला होता. हा अंदाज अचूक ठरला आणि भाजपमधून अॅड. सावंत यांचे सख्खे भाऊ डॉ. विजय सावंत यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्यात आली.