डिजिटल शाळांमध्ये उच्च दर्जाचे शिक्षण देण्याची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:27 AM2021-07-31T04:27:38+5:302021-07-31T04:27:38+5:30
इस्लामपूर : वाळवा पंचायत समितीने १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून टीव्ही संच देण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे संपूर्ण तालुका डिजिटल झाला आहे. ...
इस्लामपूर : वाळवा पंचायत समितीने १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून टीव्ही संच देण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे संपूर्ण तालुका डिजिटल झाला आहे. तालुक्यातील सर्व शाळांमध्ये उच्च दर्जाचे शिक्षण देण्याची सुविधा निर्माण झाल्याने आदर्श शाळा बनविण्याच्या कामास गती येईल, असा विश्वास जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
राजारामबापू कारखाना कार्यस्थळावर जयंत पाटील यांच्या हस्ते या टीव्ही संचाचे वाटप करण्यात आले. यावेळी सभापती शुभांगी पाटील, उपसभापती नेताजीराव पाटील, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, देवराज पाटील, पंचायत समिती सदस्य आनंदराव पाटील, गटशिक्षणाधिकारी प्रदीप कुडाळकर उपस्थित होते. येथील प्राथमिक शिक्षणाची सुविधा उच्च दर्जाची असायला हवी, या जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील ८८ शाळांना स्मार्ट टीव्हीचे वाटप करण्यात आल्याचे गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांनी सांगितले.
शिंदे म्हणाले, पंचायत समितीला प्राप्त झालेल्या १५वा वित्त आयोग आणि अबंधित निधीमधून तालुका डिजिटल करण्याकरता तसेच मॉडेल शाळांकरिता ८८ टीव्ही संच देण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व शाळांमध्ये टीव्ही संच असल्याने संपूर्ण तालुका डिजिटल तालुका झाला आहे. प्रत्येक मॉडेल शाळेला दोन टीव्ही संच उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
शिंदे म्हणाले, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांचा पाठपुरावा आणि मार्गदर्शनाखाली ‘माझी शाळा, आदर्श शाळा’ याकरिता १४ नवीन वर्गखोल्या मंजूर झाल्या आहेत. १८ वर्गखोल्यांची दुरुस्ती केली जात आहे. १६ नवीन स्वच्छतागृहे बांधली जाणार आहेत. १९ स्वच्छतागृहांची दुरुस्ती केली जाणार आहे. २० ठिकाणी हॅण्डवॉश स्टेशन बांधून पूर्ण झालेले आहेत. नऊ ठिकाणी संरक्षक भिंत बांधली जाणार आहे. येत्या काही काळात तालुक्यातील २३ शाळा आदर्श शाळा म्हणून लवकरच नावारूपास येतील.
फोटो : वाळवा तालुक्यातील प्राथमिक शाळांना जयंत पाटील यांच्या हस्ते टीव्ही संच देण्यात आले. यावेळी नेताजीराव पाटील, शुभांगी पाटील, शशिकांत शिंदे, देवराज पाटील उपस्थित होते.