कारखान्यांचे ‘तारीख पे तारीख’

By Admin | Published: January 10, 2016 12:57 AM2016-01-10T00:57:43+5:302016-01-10T00:59:13+5:30

‘म्हैसाळ’चे आवर्तन लांबणार : प्रशासनाची मात्र उद्यापासून वसुली मोहीम

Factory Date 'Date' | कारखान्यांचे ‘तारीख पे तारीख’

कारखान्यांचे ‘तारीख पे तारीख’

googlenewsNext

सांगली : जिल्ह्याच्या पूर्वभागातील चार तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभदायी ठरणाऱ्या म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्यासाठी दोन दिवसांपूर्वी सर्वमान्य तोडगा काढण्यात आला असतानाही कारखानदारांना दिलेली मुदत संपल्याने आता थकबाकी भरण्यासाठी कारखानदारांनी पुढच्या तारखेचा वायदा देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, थकबाकी भरण्यासाठी कारखानदारांची चालढकल सुरू असतानाच कृष्णा खोरे प्रशासनाकडून मात्र सोमवारपासून वसुलीसाठी खास मोहीम राबविण्यात येणार आहे.
मिरज पूर्वभाग, कवठेमहांकाळ, तासगाव आणि जत तालुक्यातील काही भागाला म्हैसाळ योजनेच्या आवर्तनामुळे फायदा होत असून, सध्या या भागात निर्माण झालेली टंचाई परिस्थिती आटोक्यात आणण्यसाठी योजनेचे आवर्तन फायद्याचे ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजयकाका पाटील यांनी पुढाकार घेत जिल्हाधिकारी कार्यालयात या लाभक्षेत्रातील साखर कारखानदार आणि प्रशासनाची बैठक बोलाविण्यात आली होती. यात म्हैसाळ योजनेतून पाणी सुरु होण्यासाठी १४ कोटी २५ लाख रुपयांची आवश्यकता असल्याची चर्चा झाली होती. त्यातही लाभक्षेत्रातील सांगलीचा वसंतदादा कारखाना, आरग येथील मोहनराव शिंदे कारखाना, केंपवाड येथील अथणी शुगर, कवठेमहांकाळमधील महांकाली कारखाना, जत कारखाना या कारखान्यांना त्यांच्या लाभक्षेत्रातील उसाच्या क्षेत्रावरुन थकबाकी भरण्यासाठी ‘टार्गेट’ देण्यात आले होते. या टार्गेटनुसार ५ कोटी २५ लाख रुपयांची रक्कम कारखानदार देणार आहेत, तर उर्वरित दोन कोटींची रक्कम शेतकऱ्यांकडून वसूल करुन थकबाकीच्या किमान पन्नास टक्के रक्कम भरुन योजना चालू करण्यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्नशील आहेत. यात कारखानदारांना उद्दिष्ट देत दोन दिवसात थकबाकीची रक्कम भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
त्यानुसार शुक्रवार, दि. ८ जानेवारीपर्यंत साखर कारखानदारांनी बैठकीत ठरलेली रक्कम भरणे अपेक्षित असताना, आता कारखानदारांनी चालढकल सुरू केल्याचे दिसून येत आहे. बैठकीत ठरल्यानुसार पाटबंधारे अधिकाऱ्यांनी शुक्रवारी कारखान्याच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला असता प्रत्येकाने वेगवेगळे कारण देत सोमवारपर्यंत रक्कम भरण्यास असमर्थता दर्शविली.
प्रशासनाने कारखानदारांशी संपर्क केला असता, मोहनराव शिंदे साखर कारखाना, आरग आणि जत कारखान्याच्या प्रशासनाने माजी मंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा करुन रक्कम भरणार असल्याचे सांगितले, तर महांकाली कारखान्याने इतर कारखान्यांनी रक्कम देताच थकबाकी भरण्याची तयारी दर्शवली आहे. वसंतदादा कारखान्याने रक्कम देण्यास कोणतीही अडचण नसून वसुलीसाठी मोहीम राबविणार असल्याचे सांगितले आहे, अशी माहिती कृष्णा खोरेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
कारखानदारांनी सोमवारनंतर रक्कम भरण्याबाबत विनंती केली असली तरी यामुळे म्हैसाळ योजनेचे आवर्तन मात्र लांबणार आहे. या दोन दिवसात थकबाकी भरली असती तर किमान जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात तरी पाणी चालू होण्याची शक्यता होती, मात्र आता आवर्तन लांबणार आहे. रक्कम भरण्यास कोणत्याही कारखान्याने प्रतिसाद न दिल्याने योजनेचे भवितव्य या घडीला तरी अधांतरीच बनले आहे.
खासदारांची भूमिका : सर्वांचे लक्ष
म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्यासाठी खासदार संजयकाका पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. गेल्या दीड महिन्यापासून थकबाकी वसुलीसाठी आणि त्यावरील तोडगा काढण्यासाठी त्यांनी बैठका घेत योजनेतून पाणी सोडण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीतही त्यांनी कारखानदारांच्या प्रतिनिधींना चांगलेच दमात घेतले होते. दोन दिवसात रक्कम भरण्याचे आश्वासन देणाऱ्या कारखानदारांनी आता कारण सांगण्यास सुरुवात केल्याने खासदारांच्या आगामी भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
थकबाकीचीच अडचण
टंचाई अथवा शासनाच्या इतर कोणत्या तरी योजनेतून थकबाकीची रक्कम भरली जाईल आणि म्हैसाळ योजनेतून पाणी सोडले जाईल, ही शक्यता मात्र आता मावळली आहे. खासदार संजयकाका पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असता, पहिल्यांदा थकबाकी भरा, मगच योजना सुरू करण्याबाबत चर्चा करुया, असे स्पष्टपणे त्यांनी सांगितल्याने आता थकबाकी भरल्याशिवाय योजना सुरु होणे अशक्य बनले आहे.

Web Title: Factory Date 'Date'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.