कारखाना सांगलीत, गुंतवणूक रत्नागिरीत
By admin | Published: April 2, 2017 11:32 PM2017-04-02T23:32:10+5:302017-04-02T23:32:10+5:30
कागदपत्रे गायब : वसंतदादा कारखान्यात अजब कारभार
सांगली : वसंतदादा कारखान्याच्या तिजोरीतील पैसा मनमानी पद्धतीने वापरण्याचा पायंडा गेल्या अनेक वर्षांपासून पडला आहे. त्याचाच एक भाग म्हणून तत्कालीन संचालक मंडळाने सांगली कार्यक्षेत्र असताना रत्नागिरी जिल्ह्यात जमीन खरेदी केली. या व्यवहाराची कोणतीही कागदपत्रे चौकशी अधिकाऱ्यांकडे सादर केली नाहीत. त्यामुळे २४ लाख ४२ हजार रुपयांचा ठपका तत्कालीन पदाधिकारी, संचालक मंडळ, लेखापाल आणि कार्यकारी संचालकांवर ठेवण्यात आला आहे.
कलम ८३ च्या चौकशी अधिकारी डी. एस. खांडेकर यांनी या प्रकरणाची चौकशी करताना, गुंतवणूक कार्यक्षेत्राबाहेर का केली?, असा सवाल उपस्थित केला. याशिवाय संबंधित जागेच्या कागदपत्रांची मागणीही केली होती. सात-बारा उतारा व अन्य दस्तऐवज उपलब्ध करण्यास तत्कालीन संचालक मंडळाने असमर्थता दर्शविली. कागदपत्रेच सादर न झाल्याने तत्कालीन मंडळावरील आर्थिक घोटाळ्याचा ठपका अधिक गडद झाला. १९९७-९८ पासूनची ही रक्कम थकीत आहे. त्यामुळे २४ लाख ४२ हजाराच्या या गुंतवणुकीसह आजपर्यंतच्या व्याजाचा भुर्दंडही कारखान्याला बसला. या नुकसानीस तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, कार्यकारी संचालक, मुख्य लेखापाल यांना जबाबदार धरून त्यांच्यावर वसुलीची जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशी शिफारस करण्यात आली आहे. सांगली जिल्हा कार्यक्षेत्र असणाऱ्या या कारखान्याने रत्नागिरीत जागा घेण्याचे कोणतेही कारण स्पष्ट केलेले नाही. या जमिनीची कागदपत्रे नेमकी गेली कुठे?, हासुद्धा संशोधनाचा भाग बनला आहे.
कारखान्याने वसंतदादा सर्व सेवा संघास ३१ मार्च २०१३ अखेर २ कोटी १५ लाख २५ हजार रुपये दिले होते. ही रक्कम अद्याप कारखान्याला मिळाली नाही. संघाने ही रक्कम वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेत ठेवली होती. आता ही बँक अवसायनात असून त्याचीही चौकशी सुरू आहे. त्यामुळे या रकमेचा परतावा मिळणे आता मुश्किल बनले आहे.
तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ आणि अधिकाऱ्यांकडून या रकमेची वसुली करावी, अशी शिफारस करण्यात आली आहे. ही रक्कम तोडणी, वाहतुकीच्या कामासाठी देण्यात आली होती. (प्रतिनिधी)
वसंतदादा बँकही चर्चेत
वसंतदादा कारखान्याच्या चौकशीत वसंतदादा बँकेतील अडकलेल्या वसंतदादा सेवा संघाच्या रकमेचा उल्लेख आहे. दोन्ही संस्था दादांच्या नावच्या असून अशाच गैरकारभारामुळे दोन्ही संस्था अडचणीत आल्या आहेत. तोडणीच्या कामासाठी सेवा संघास दिलेली २ कोटी १५ लाखाची रक्कम आता परत मिळणे, चौकशी अधिकाऱ्यांनाही मुश्किल वाटत असल्याने त्याची जबाबदारी निश्चित करण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी ५९ वर्षांपूर्वी उभारलेल्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या साखर कारखान्याला दादांच्या जन्मशताब्दी वर्षातच घरघर लागली. कमी शिक्षण असतानाही, आर्थिक शिस्त आणि काटेकोर नियोजनाने कारखाना चालवून वसंतदादांनी सहकार चळवळीसमोर घालून दिलेला आदर्श, त्यांच्याच कारखान्यात उद्ध्वस्त झाला. सहकार विभागाने त्यांच्या चौकशी अहवालात, कारखान्यातील गेल्या काही वर्षातील आर्थिक बेशिस्तपणाची चिरफाड केली आणि तत्कालीन संचालक, अधिकाऱ्यांनी केलेले गैरप्रकार चव्हाट्यावर आणले. कारखान्याचे धुराडे काळवंडण्यास कारणीभूत असलेल्या बेकायदेशीर गोष्टींचा पर्दाफाश करणारी मालिका आजपासून...