फडणवीस, सदाभाऊंचा संप मोडण्याचा डाव...
By admin | Published: June 4, 2017 01:15 AM2017-06-04T01:15:21+5:302017-06-04T01:15:21+5:30
पाटील, औंधकर : इस्लामपुरात प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : शेतकऱ्यांचा संप मोडून काढण्याचे षड्यंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रचल्याचा आरोप बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक बी. जी. पाटील व संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुयोग औंधकर यांनी शनिवारी केला. शासनाच्या कृषी प्रदर्शनाचे ठेके घेणारा आरएसएसचा व सदाभाऊंचा हस्तक संदीप गिड्डे व जयाजी सूर्यवंशी यांना शेतकऱ्यांच्या कोअर कमिटीत घुसवून शेतकऱ्यांचे आंदोलन ‘हायजॅक’करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री व खोत यांनी केल्याचा आरोपही त्यांनी केला.
पेठ-सांगली रस्त्यावरील मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयाच्या पश्चिमेस असणाऱ्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या प्रवेशद्वारावर सकाळी बळीराजा संघटना व संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, स्वामिनाथन आयोग लागू करा, अशा घोषणा दिल्या. शेतकऱ्यांचा संप मोडीत काढण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मुख्यमंत्री व कृषी राज्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांना जोडे मारून त्यांचे दहन केले. बी. जी. पाटील, सुयोग औंधकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनावेळी सचिन थोरबोले, सुधीर कदम, अमोल चव्हाण, अशोक सलगर, आबासाहेब काळे, गणेश काळे उपस्थित होते. शेतकऱ्यांनी संप मागे घेतला, अशी खोटी व फसवी घोषणा शासन करीत आहे, मात्र संप अजूनही सुरूच राहणार आहे. शेतकऱ्यांनी या खोट्या प्रचाराला बळी न पडता सावध रहावे, असे आवाहन पाटील व औंधकर यांनी केले.
त्यानंतर पत्रकार बैठकीत पाटील म्हणाले की, फडणवीस आणि खोत यांनी संदीप गिड्डे व जयाजी सूर्यवंशी यांना हाताश्ी धरून कोअर कमिटी बैठकीवेळी काय बोलायचे, कशी भूमिका घ्यायची, याची प्राथमिक बोलणी करत पुणतांबा येथील आंदोलनस्थळी पाठविले. त्यानुसार या दोघांनी मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या शेतकऱ्यांच्या कोअर कमिटीचा आणि बैठकीचा ताबा घेतला.
बैठकीत गिड्डे व सूर्यवंशी यांनी शेतकऱ्यांच्या मूळ मागण्यांना बगल देत चर्चा घडवली. यावेळी शेतकरी प्रतिनिधी बैठकीतून बाहेर निघून गेले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या ७० टक्के मागण्या मान्य केल्याच्या मुद्द्याशी सहमत व्हायला कोअर कमिटीला भाग पाडले. हा तपशील गिड्डे याने सोशल मीडियावर पोस्ट करून शेतकऱ्यांचा संप मागे घेण्यात आल्याची कोल्हेकुई सुरू केली.
पाटील म्हणाले की, फडणवीस आणि खोत यांच्या शेतकरी संप मोडीत काढण्याच्या कृत्याची सखोल चौकशी व्हावी तसेच शेतकरीविरोधी भूमिका घेणाऱ्या गिड्डे व सूर्यवंशी यांच्या संपत्तीची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. शेतकऱ्यांकडून समोर आलेल्या सर्व मागण्या न्याय्य आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी सरसकट कर्जमाफी व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी आवश्यक आहे.
विशेष अधिवेशन बोलवा
बी. जी. पाटील म्हणाले की, राज्यात अराजकता माजण्यापूर्वी शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एक दिवसाचे अधिवेशन घ्यावे. हे अधिवेशन राज्यातील शेतकरी व जनतेसाठी खुले ठेवून मुख्यमंत्री, मंत्री व २८८ आमदार शेतकऱ्यांच्या कर्जमाफी व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींबाबत काय बोलतात, हे कानाने ऐकता आणि डोळ्यांनी पाहता येईल. कर्जमाफीबाबत कोणाची काय भूमिका आहे, हे स्पष्ट होईल. त्यासाठी कोणाच्या मध्यस्थीची गरज भासणार नाही.