Sangli: तासगाव मल्टीस्पेशालिटीबाबत खासदारांची ‘बोलाचीच कढी’; दोन वर्षांपासून धूळ खात 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 05:48 PM2023-11-28T17:48:09+5:302023-11-28T17:48:29+5:30

सहा कोटींचा निधी कुचकामी; आश्वासन हवेतच

Failure of municipal administration and leaders to start a multispecialty hospital in Tasgaon | Sangli: तासगाव मल्टीस्पेशालिटीबाबत खासदारांची ‘बोलाचीच कढी’; दोन वर्षांपासून धूळ खात 

Sangli: तासगाव मल्टीस्पेशालिटीबाबत खासदारांची ‘बोलाचीच कढी’; दोन वर्षांपासून धूळ खात 

दत्ता पाटील

तासगाव : तासगाव शहरातील जनतेच्या सोयीसाठी खासदार संजय पाटील यांच्या पुढाकाराने तब्बल सहा कोटी तीस लाख रुपयांचा निधी खर्ची टाकून कस्तुरबा गांधी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात आले. तब्बल दोन वर्षांपूर्वी या हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा झाला. एक वर्षानंतर खासदारांनी लवकरच हॉस्पिटल सुरू करण्याचे आश्वासन दिले. मात्र त्यांचे आश्वासन हवेतच राहिले. खासदारांचे आश्वासन ‘बोलाचीच कढी’ ठरली असून दोन वर्षे झाले तरी हे हॉस्पिटल सुरू करण्यात पालिका प्रशासन आणि नेत्यांना अपयश आले आहे.

तासगाव नगरपालिकेच्या कस्तुरबा गांधी रुग्णालयाच्या जागेवर खासदार संजय पाटील यांच्या प्रयत्नातून सहा कोटी तीस लाख रुपये खर्चून कस्तुरबा गांधी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात आले. शंभर बेड ऑक्सिजन प्लॅन्टसह सर्व सुविधांनी सुसज्ज असे हॉस्पिटल उभा राहिले. १ जानेवारी २०२२ रोजी या हॉस्पिटलचे दिमाखात लोकार्पण करण्यात आले. मात्र तेव्हापासून आजतागायत हे हॉस्पिटल धूळ खात पडून आहे.

एक वर्षांपूर्वी ‘लोकमत’मधून या हॉस्पिटलच्या अवस्थेबाबत आवाज उठवण्यात आला होता. त्यावेळी खासदार पाटील यांनी लवकरच हे हॉस्पिटल सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते. त्याच वेळी उपमुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसमवेत प्रशासनाची बैठक घेऊन हॉस्पिटलचा प्रश्न मार्गी लावणार असण्याची असल्याची घोषणा केली होती. या घोषणेला आता वर्ष होत आले. हॉस्पिटलची इमारत पूर्ण होऊन दोन वर्षे झाली. मात्र खासदारांची घोषणा हवेतच राहिली.

शासनाचा निधी मिळवून कोट्यवधी रुपये खर्ची टाकले. मात्र शहरातील सामान्य जनतेला आरोग्याची सुविधा मिळवून देण्यात नेत्यांना आणि प्रशासनाला पूर्णपणे अपयश आल्याचे दिसून येत आहे. दोन वर्षांपासून धूळ खात पडून असणारे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करायला आणखी किती वर्षे लागतील, असा प्रश्न सामान्य नागरिकांतून विचारला जात आहे.

तासगाव शहरातील रुग्णांची गैरसोय होत आहे. आमदार, खासदार याबाबत काहीच बोलायला तयार नाहीत. सामान्य जनतेच्या हिताशी नेत्यांना कोणतेच सोयरसुतक उरलेले नाही. त्यामुळेच हे हॉस्पिटल धूळ खात पडून आहे. केवळ मतांचे राजकारण तासगाव शहरातील जनतेपुढे मांडून नेत्यांचा नाकर्तेपणा घराघरांत पोहोचवला जाईल. हॉस्पिटल सुरू करण्याबाबत महिन्याभरात ठोस निर्णय झाला नाही, तर तासगावच्या जनतेच्या वतीने लढा उभा करू. - शरद शेळके, सामाजिक कार्यकर्ते, तासगाव.

Web Title: Failure of municipal administration and leaders to start a multispecialty hospital in Tasgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.