शेरीनाल्याचे अपयश ‘एमजीपी’मुळे
By admin | Published: October 15, 2015 11:03 PM2015-10-15T23:03:24+5:302015-10-16T00:56:00+5:30
नव्याने प्रस्ताव : दोन नाल्यांचा योजनेत समावेशच नाही
सांगली : शेरीनाला योजनेत कोल्हापूर रोड व गावभागातून येणाऱ्या दोन्ही नाल्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. शेरीनाला योजनेचा आराखडा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने तयार केलेला होता. ‘एमजीपी’ने या दोन नाल्यांचा विचारच आराखड्यात केला नसल्याने नदीचे प्रदूषण सुरूच आहे. याबाबत स्थायी समितीचे सभापती संतोष पाटील यांनी नाराजी व्यक्त करीत, या दोन्ही नाल्यांतील सांडपाण्याच्या विल्हेवाटीसाठी नवीन प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले. कृष्णा नदीत सांगली शहरातील चार नाले मिसळत आहेत. त्यापैकी कर्नाळ रस्ता व कुपवाड-मीरा हौसिंग सोसायटीमार्गे येणारे नाले वसंतदादा स्मारकाच्या उत्तरेकडून येतात. तसेच खणभाग, गावभागातून वैरण बाजार मार्गे व कोल्हापूर रस्त्याकडील नाला, असे दोन नालेही नदीपात्रात मिसळतात. शेरीनाला योजनेत कर्नाळ रस्ता व मीरा हौसिंग सोसायटीकडून येणाऱ्या दोन नाल्यांचाच विचार करण्यात आला आहे. उर्वरित दोन नाल्यांचा त्यात समावेश नाही. या योजनेवर राष्ट्रीय नदी कृती अभियानातून ३० कोटीपेक्षा अधिक रुपयांचा खर्च करण्यात आला. स्थायी समितीचे सभापती संतोष पाटील यांनी गुरुवारी शेरीनाला योजनेची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, शेरीनाला योजनेसाठी शासनाने महापालिकेवर विश्वास न दाखविता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे काम सोपविले होते. जीवन प्राधिकरणने केवळ दोनच नाल्यांचा विचार करून योजना तयार केली. त्यामुळे नदीचे प्रदूषण पूर्णत: रोखले गेलेले नाही. आता उर्वरित दोन नाल्यांसाठी माईघाटावर सांडपाणी शुद्धीकरण यंत्रणा उभारावी लागेल अथवा हे सांडपाणी हनुमाननगर येथील आॅक्सिडेशन पाँडपर्यंत न्यावे लागणार आहे. तसा प्रस्ताव लवकरच तयार केला जाईल. (प्रतिनिधी)
मुहूर्त सापडला : पंपिंग आज सुरू
शेरीनाल्याचे पंपिंग शुक्रवारपासून सुरू करण्यात येत आहे. धुळगावमधील ८०० एकर क्षेत्राला शेरीनाल्याचे पाणी दिले जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची सोसायटी स्थापन केली जाईल. त्यामार्फत वितरण व्यवस्थाही तयार करण्याचा प्रयत्न असल्याचेही पाटील म्हणाले.