परप्रांतीय एजंटांमार्फत बनावट नोटा चलनात- : सांगलीत सहा महिन्यांपासून छपाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 10:12 PM2019-01-21T22:12:21+5:302019-01-21T22:15:00+5:30
बनावट नोटांची छपाई करणारा मुख्य सूत्रधार विश्वनाथ जोशी याने सहा महिन्यांपासून सांगलीत बनावट नोटांची छपाई सुरु केली होती,
सांगली : बनावट नोटांची छपाई करणारा मुख्य सूत्रधार विश्वनाथ जोशी याने सहा महिन्यांपासून सांगलीत बनावट नोटांची छपाई सुरु केली होती, अशी माहिती गांधीनगर पोलिसांच्या चौकशीतून पुढे आली आहे. नोटांची छपाई करुन त्या चलनात आणण्यासाठी गर्दीची ठिकाणे निवडली होती. यासाठी त्याने परप्रांतीय तरुणांची एजंट म्हणून नियुक्ती केली होती, अशी माहिती अटकेतील अभिजित पवार याच्या चौकशीतून निष्पन्न झाली आहे. दरम्यान, जोशी याच्याविरुद्ध सांगली पोलिसांत डिझेल चोरीसह अन्य गुन्हे दाखल आहेत.
कोल्हापुरातील गांधीनगर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी अभिजित पवार (रा. उचगावपैकी ता. करवीर) यास अटक केली होती. त्याच्याकडून बनावट नोटा जप्त केल्या होत्या. या नोटा त्याने विश्वनाथ जोशी याच्याकडून आणल्याची कबुली दिली. तसेच इचलकरंजी (जि. कोल्हापूर) येथील प्रवीणकुमार उपाध्ये हाही त्याच्याकडून नोटा आणत असल्याचे सांगितले होते. जोशीच्या शोधासाठी दोन दिवसांपूर्वी सांगलीत शामरावनगरमध्ये अरिहंत कॉलनीत ‘विजया निवास’ या बंगल्यावर छापा टाकला. पण तत्पूर्वीच जोशी तेथून पसार झाला होता. जोशीच्या डोंगरसोनी (ता. तासगाव) येथील गावातही छापा टाकून शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. जोशी या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आहे. तो सापडत नसल्याने गांधीनगर पोलिसांचा तपास पुढे सरकला नाही.
सहा महिन्यांपूर्वी सांगली शहर पोलिसांनी बनावट नोटांचे प्रकरण उजेडात आणले. पश्चिम बंगालपर्यंत पोलिसांनी तपास केला. हा तपास थांबल्यानंतर जोशीने स्वत:च्या बंगल्यात बनावट नोटांची छपाई सुरु केल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. सांगली, कोल्हापूर व सातारा येथील काहीजणांशी संपर्क साधून, या नोटा चलनात आणण्याचा त्याने प्रयत्न केला. यामध्ये अभिजित पवार, प्रवीणकुमार उपाध्ये यांचा समावेश आहे. आठवडा बाजारासह अन्य गर्दीच्या ठिकाणी नोटा चलनात आणण्याचे त्याने नियोजन केले होते. यासाठी परप्रांतीय तरुणांची एजंट म्हणून नियुक्ती केली होती. गेल्या आठवड्यात सांगलीत संजयनगरच्या आठवडा बाजारात बनावट नोटा खपविल्याचा प्रकार घडला होता. यामागे जोशीचा हात असण्याची शक्यता आहे. आतापर्यंत किती नोटांची छपाई केली, याची माहिती जोशी सापडल्याशिवाय समजणार नाही, असे गांधीनगर पोलिसांनी सांगितले.
जोशीविरुद्ध गुन्हे
जोशी याच्याविरुद्ध सांगली पोलिसांत यापूर्वी डिझेल चोरीसह अन्य गुुन्हे दाखल आहेत. काही महिन्यांपूर्वी तो जामिनावर बाहेर आला होता. सांगलीत त्याने प्लॉट घेऊन आलिशान बंगला बांधला. एका राजकीय पक्षात तो काम करीत होता. गांधीनगर पोलीस मागावर असल्याची चाहूल लागताच तो बंगल्यातून मोठी बॅग घेऊन बाहेर पडला. या बॅगेत कदाचित बनावट नोटा असण्याची शक्यता आहे.