हप्ते थकलेला ट्रक परस्पर विकून चोरीचा बनाव, दोघांना अटक
By घनशाम नवाथे | Published: July 22, 2024 06:24 PM2024-07-22T18:24:11+5:302024-07-22T18:24:30+5:30
नंबरप्लेट बदललेला ट्रक जप्त
सांगली : ट्रकच्या कर्जाचे हप्ते थकल्यानंतर तो परस्पर विकून टाकला. तसेच साथीदाराचा ट्रक मिरजेत काही दिवस लावला. तेथून तो सांगलीत ट्रक अड्डयावर आणला. त्यानंतर चुलत्यास खोटे सांगून मिरजेत खोटी फिर्याद देण्यास लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत बिरदेव बाळू गडदे (वय २६, रा. गौंडवाडी, सांगोला) व गणेश अनिल भोसले (वय ३२, रा. रमामातानगर, सांगली) या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित बिरदेव गडदे याला ट्रक घेण्यास अर्थसहाय्य न मिळाल्यामुळे त्याने चुलते यशवंत गडदे यांच्या नावाने कर्ज प्रकरण करून ट्रक (एमएच ५० ४८७५) घेतला. बिरदेव हा ट्रक स्वत: वापरत होता. कर्जाचे हप्ते थकीत राहिल्यानंतर त्याने साथीदार गणेश भोसले याच्या मदतीने ट्रक मोहन शेंबडे (रा. सांगोला) यांना विकला. त्यानंतर साथीदार गणेश भोसले याच्या ट्रक (एमएच १० झेड ४५८४) ची नंबरप्लेट काढून त्याला विकलेल्या ट्रकची नंबरप्लेट जोडली.
मिरज-पंढरपूर रस्त्यावर शेतकरी ढाब्याजवळ काही काळ ट्रक लावून ठेवला. त्यानंतर एक दिवशी शेजारील कोणाला न सांगता ट्रक पुन्हा सांगलीत आणून विश्रामबाग अड्ड्यावर लावला. त्यानंतर चुलते यशवंत गडदे यांना त्यांच्या नावे घेतलेला ट्रक चाेरीस गेल्याचे खोटे सांगितले. तसेच त्यांना मिरज शहर पोलिस ठाण्यात खोटी फिर्याद देण्यास लावले. गडदे यांनी दि. १४ जुलै राेजी फिर्याद दिली होती.
दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला मिरजेतून चोरीस गेलेला ट्रक विश्रामबाग अड्डयावर लावला असून दोघे संशयित तेथे थांबल्याची माहिती मिळली. त्यानुसार पथक विश्रामबाग अड्ड्यावर गेले. तेथे एका ट्रकच्या नंबरप्लेटला काळे फासल्याचे तसेच दोघेजण जवळ थांबल्याचे दिसले. पथकाने दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा त्यांनी खरी हकीकत सांगून गुन्ह्याची कबुली दिली.
गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक पंकज पवार, सिकंदर वर्धन, कर्मचारी संकेत मगदूम, अमोल ऐदाळे, आमसिद्ध खोत, अमोल लोहार, बाबासाहेब माने, अमर नरळे, सोमानाथ गुंडे, अनंत कुडाळकर, श्रीधर बागडी, सुनिल जाधव, रोहन गस्ते, अभिजीत ठाणेकर, अजय बेंदरे, गणेश शिंदे, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने कारवाई केली.
दोन्ही ट्रक जप्त
पोलिसांनी नंबरप्लेट बदललेला ट्रक जप्त केला. त्यानंतर तपासात चोरीस गेल्याचे दाखवण्यात आल्यामुळे मूळ ट्रकही सांगोला येथून जप्त केला. दोन्ही ट्रकची किंमत ७ लाख १० हजार रूपये इतकी दाखवली आहे.