थकबाकी भरूनही ‘बनेवाडी’ बंदच

By Admin | Published: March 22, 2016 11:35 PM2016-03-22T23:35:24+5:302016-03-23T00:44:35+5:30

शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत : योजना अडकली तांत्रिक बिघाडाच्या गर्तेत

False farewell to 'Make-Vadi' | थकबाकी भरूनही ‘बनेवाडी’ बंदच

थकबाकी भरूनही ‘बनेवाडी’ बंदच

googlenewsNext

लखन घोरपडे :: देशिंग ::कवठेमहांकाळ तालुक्याच्या पश्चिम विभागातील भागाला पाणी देण्यासाठी म्हैसाळ योजनेपासून कार्यान्वित करण्यात आलेली बनेवाडी उपसा सिंचन योजना तांत्रिक बिघाडाच्या गर्तेत अडकली आहे. शेतकऱ्यांनी पैसे भरून तब्बल आठ दिवस झाले तरीही, पाटबंधारे विभागाकडून योजना चालू करण्यात आलेली नाही.दरम्यान, खरशिंग, बनेवाडी या गावांतील शेतकऱ्यांनी तब्बल तीन लाख रूपये गोळा करून मागील आठवड्यात सोमवार दि. १४ रोजी ही रोख रक्कम पाटबंधारे विभागाचे अधिकारी नलवडे यांच्याकडे सुपूर्द केली होती. ही थकबाकीची रक्कम भरताच योजनेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ उपसा सिंचन चालू करण्याचे आदेश दिले. मात्र यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अद्याप ही योजना बंदच आहे. थकबाकीचे पैसे भरून आठ दिवस होऊनही योजना चालू न झाल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील खरशिंग, बनेवाडी, अलकूड, हरोली, देशिंग या परिसरातील ११५० हेक्टर शेतीला या उपसा सिंचन योजनेतून पाणी देण्यात येते. तसेच येथील शेती पावसाव्यतिरिक्त या पाण्यावर अवलंबून आहे. शिवाय पावसाने ओढ दिल्याने पिके वाळून गेली आहेत, तर तलावातील पाणीसाठाही संपुष्टात आला आहे. त्यामुळे पाच गावांसाठी असणारी हरोली तलावातील गाव पाणीपुरवठा योजनाही बंद होत आल्याने, गावांमध्ये चार ते पाच दिवसांतून एकदा पिण्याचा पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी सर्वत्र भटकावे लागत आहे. या परिसरात द्राक्ष तसेच ऊसशेती मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र पाण्याविना ही शेती वाळून जाण्याच्या मार्गावर असल्याने, उपसा सिंचनची थकित बाकी भरूनही हजारो रूपये खर्चून शेतीला टँकरने पाणी पुरवठा करून शेती वाचविण्याचा प्रयत्न येथील शेतकऱ्यांकडून केला जात आहे. पैसे भरूनही येथील नियोजनशून्य कारभारामुळे गेल्या आठ दिवसांपासून शेतकऱ्यांना फटका बसत आहे
मुख्य आवर्तनाचे दिवस संपत आले असल्याने बनेवाडी उपसा सिंचन योजनेतून शेतकऱ्यांना पाणी सुटणार तरी कधी? असा सवाल आता शेतकरी करू लागले आहेत.


पैसे भरले, तरीही पाणी नाही
तालुक्याच्या पश्चिम विभागाला वरदान ठरणारी बनेवाडी उपसा सिंचन योजना म्हैसाळच्या मुख्य कालव्यात पाणी येऊनही थकबाकीमुळे बंद होती. परंतु या परिसरामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याने येथील शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी बनेवाडी, खरशिंग गावामधील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांकडील तब्बल तीन लाखांची रक्कम पाटबंधारे विभागात भरण्यात आली. मात्र पैसे भरूनही योजना बंद असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
गुजरातमधून सुटे भाग येण्यास आणखी दोन दिवस
बनेवाडी उपसा सिंचन योजना चालू करण्यासाठी तांत्रिक बिघाड असल्याने, ही योजना चालू करण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक बोर्डमधील पार्ट जळाला असल्याने, तो गुजरात येथून मागविला आहे. हा पार्ट येण्यास आणखी दोन ते तीन दिवस लागणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले .

Web Title: False farewell to 'Make-Vadi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.