बेळुंखीत पन्नास हजारचा गांजा जप्त
By admin | Published: April 7, 2016 10:59 PM2016-04-07T22:59:45+5:302016-04-08T00:08:52+5:30
दोघा भावांना अटक : जतमध्ये कारवाई
जत : तालुक्यातील बेळुंखी येथील माळी वस्तीवरील उसाच्या शेतात अचानक छापा टाकून जत पोलिसांनी एक किलो तयार गांजासह बारा किलोग्राम गांजा जप्त केला आहे. त्यामध्ये ५६ झाडांचा समावेश आहे. त्याची एकूण किंमत ५० हजार ६६० रुपये इतकी आहे. याप्रकरणी शेतजमीन मालक बबन पांडुरंग भोसले (वय ६३) व मारुती पांडुरंग भोसले (वय ५५, रा. दोघे बेळुंखी (ता. जत) या सख्ख्या भावांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्यादरम्यान करण्यात आली आहे. याबाबत बबन आणि मारूती यांच्याविरोधात जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील वाशाण ते बेळुंखी दरम्यान बेळुंखीपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर माळी वस्ती आहे. तेथे बबन व मारुती या सख्ख्या भावाची एकत्रित शेतजमीन आहे. रस्त्यापासून आत सुमारे पन्नास मीटर अंतरावर उसाच्या शेतात त्यांनी गांजाची झाडे लावली आहेत. याची माहिती खबऱ्यामार्फत जत विभाग पोलिस उपअधीक्षक नागनाथ वाकुर्डे याना मिळाल्यानंतर त्यांनी बुधवारी रात्री सहकाऱ्यांसमवेत छापा टाकला असता, तिथे ते चार फूट उंचीची गांजाची ५६ झाडे, एकूण अकरा किलोग्राम वजनाची मिळून आली आहेत. यावेळी त्यांच्या घराची झडती घेतली असता एक किलो ग्राम तयार गांजा पिशवित भरून ठेवलेला सापडला आहे. गांजाच्या झाडाची किंमत ४२ हजार ६४ रुपये व तयार गांजाची किंमत ७ हजार पाचशे वीस रुपये असा एकूण ५० हजार ६६० रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत जत विभाग पोलिस उपअधीक्षक नागनाथ वाकुर्डे, पोलिस उपनिरीक्षक सुभाष कांबळे, मनोज सोनबलकर व पोलिस कर्मचारी तम्मा चोरमुले, आप्पा दराडे, विठ्ठल माळी, अमिर फकीर, विजय अकुल आदी सहभागी झाले होते. (वार्ताहर)