आईला शंभर रुपये देऊन कुटुंब गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 10:57 PM2017-07-18T22:57:25+5:302017-07-18T22:57:25+5:30
आईला शंभर रुपये देऊन कुटुंब गायब
दत्ता यादव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : पंचवीस हजारांहून अधिक दरमहा पेन्शन असणाऱ्या माजी सैनिक राहुल आढाव यांच्यावर खासगी सावकारामुळे कंगाल होण्याची वेळ आली. घरात एकवेळचे जेवण मिळणेही अवघड झाले. एवढेच नव्हे तर पत्नी आणि दोन मुलींना अंगभर कपडेही मिळणे मुश्कील झाले. हा सारा प्रकार असहाय्य झाल्याने त्यांनी ‘सुसाईड नोट’ लिहून आईच्या हातावर शंभर रुपये ठेवले अन् घरातून कायमचे निघून जाण्याचा निर्णय घेतला.
राहुल आढाव हे पत्नी स्वाती, दोन मुली समुद्धी (वय १२) व सिद्धी (वय ७) यांना घेऊन ४ जुलैपासून बेपत्ता झाले आहेत. या प्रकरणातील नेमकी वस्तूस्थिती जाणून घेण्यासाठी मंगळवारी दुपारी ‘लोकमत’ टीम तामजाईनगर येथील रुद्राक्ष रेसिडन्सीमध्ये गेली.
यावेळी राहुल आढाव यांचा फ्लॅट बंद होता. त्यांच्या फ्लॅटच्या समोर राहत असलेल्या सीमा जाधव या राहुल आढाव यांच्या पत्नीच्या खास मैत्रिण असल्याचे त्यांनी सांगितले. आढाव कुटुंबाबाबत त्यांच्याकडे विचारपूस सुरू केल्यानंतर त्यांनी या प्रकरणातील अनेक धक्कादायक महिती दिली.
त्या म्हणाल्या, ‘एके दिवशी रात्री दहा ते बाराजण आले. त्यांनी शिवीगाळ करून आढाव कुटुंबाला अंगावरील कपड्यानिशी फ्लॅटमधून बाहेर काढले. त्या दिवसांपासून त्यांची मोठी आर्थिक कोंडी सुरू झाली. कपडे घेण्यासही जेवणासाठीही पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी जुन्या बाजारातून कपडे आणून उदरनिर्वाह सुरू केला. मुले इंग्रजी शाळेमध्ये असल्यामुळे त्यांचा खर्चही प्रचंड होता. त्यांना शेवटी आम्ही कपडे दिली, हे सांगत असताना सीमा जाधव भावनाविवश झाल्या. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कोणालाही घाबरणार नाही.’
..पण माझा मुलगा सुखरुप असावा !
राहुल आढाव व पत्नी श्वेता या घरातून जाताना त्यांनी आईच्या हातावर शंभर रुपये ठेवले. ‘आम्ही परत येतो,’ असे म्हणून दोघेही निघून गेले. त्या दिवसांपासून त्यांच्या आईने अन्न सोडले आहे. मुलाचा शोध लागावा म्हणून त्या पोलिस अधीक्षकांना भेटण्यासाठी आल्या होत्या. ‘माझा मुलगा सुखरुप असावा,’ अशी इच्छा व्यक्त केली.
पोलिसांचे पथक पुण्याला !
राहुल आढाव हे घरातून निघून गेल्यानंतर काही दिवस ते पुण्यात वास्तव्यास होते, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी पथक पुण्याला रवाना केले आहे. तसेच त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये व्यवहार कधी व कुठे झाले, मोबाइलचे शेवटचे लोकेशनचा तपशील पोलिसांनी मागविला आहे. यानंतर यातील नेमकी माहिती समोर येईल, असे तपासी अधिकारी अशोक ससाणे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
साहित्य राहूद्या.. देव्हारा तरी द्या !
आढाव कुटुंबाला फ्लॅटमधून बाहेर काढल्यानंतर त्यांच्या पत्नीने, ‘वस्तू राहू द्या पण आमचा देवारा तरी द्या,’ अशी मागणी केली. मात्र संबंधितांनी त्यांचे काहीही ऐकून घेतले नसल्याचे सीमा जाधव यांनी सांगितले. स्वाती आढाव या देवाऱ्याजवळ नेहमी पूजा करत असत.
पोलिसांनी
दफन केलेली
‘ती’ मुलगी कोण?
येथील क्षेत्रमाहुली नदीमध्ये अकरा ते बारा वर्षाच्या मुलीचा दहा दिवसांपूर्वी पोलिसांना मृतदेह सापडला होता. बरेच दिवस झाले तरी पोलिसांना संबंधित मुलीची ओळख पटली नाही. त्यामुळे पोलिसांनी अखेर त्या मुलीचा मृतदेह दफन केला. मात्र या आढाव कुटुंबाच्या बेपत्ता होण्याच्या निमित्ताने चर्चेला उधाण आले असून पोलिसांनी दफन केलेली ‘ती’ मुलगी कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्या मुलीचे कपडे पोलिसांकडे आहेत. नातेवाईकांना यासंदर्भात माहिती दिल्यास या प्रकरणामध्ये काही धागेदोरे हाती लागतायत का, याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.