आष्ट्यात महिला वकिलासह कुटुंबियांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:26 AM2021-03-21T04:26:03+5:302021-03-21T04:26:03+5:30
आष्टा : येथील खोत मळा (अमृतवाडी) येथील वर्षा शिवाजी पाटील या महिला वकिलासह सासू, दीर, जाऊ, नणंद यांना शेतातील ...
आष्टा :
येथील खोत मळा (अमृतवाडी) येथील वर्षा शिवाजी पाटील या महिला वकिलासह सासू, दीर, जाऊ, नणंद यांना शेतातील रस्त्याच्या वहिवाटीवरून तलवार, काठ्या, कोयता, कुदळीने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. यात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
खोत मळा येथील शेतातील रस्ता वहिवाटीच्या कारणावरून जालिंदर सोमाजी चोरमुले व त्यांचे नातेवाईक यांच्यासोबत पाटील कुटुंबाचा वाद आहे. तहसीलदारांनी हा रस्ता खुला करून दिला आहे, तरीही चोरमुले यांनी हा रस्ता नांगरून टाकला आहे. गुरुवारी वर्षा पाटील यांच्या जाऊ धनश्री तानाजी पाटील यांना ज्योती जालिंदर चोरमुले, मंगल शहाजी नरुटे, कौशल्या चोरमुले, अंकुश चोरमुले यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याची तक्रार आष्टा पोलिसांत दिली होती.
शनिवारी सकाळी वर्षा पाटील यांच्यासह दीर संभाजी व तानाजी, जाऊ धनश्री व शुभांगी, कल्पना यांच्यासह सासू राजाक्का, नणंद अंजूबाई घरी होत्या. वर्षा पाटील यांची मुलगी मृणाली शाळेतून चोरमुले यांनी नांगरलेल्या वाटेने घरी येत असताना तिच्यापाठोपाठ जालिंदर चोरमुले, रवींद्र चोरमुले, कौशल्या चोरमुले, ज्योती चोरमुले, मंगल नरुटे, अंकुश चोरमुले, बाळासाहेब किसन शेळके, त्यांची दोन मुले संग्राम व किरण यांच्यासह अनोळखी २५ लोक आले. त्यांच्या हातात तलवार, काठ्या, कोयता, कुदळ होती.
त्यांनी पाटील यांच्या घरात प्रवेश केला. घरातील कोणालाही जिवंत ठेवू नका, ठार मारून टाका, असे म्हणून घरातील साहित्याची नासधूस केली व घरातील लोकांना धमकावून बाहेर काढले. संभाजी पाटील व तानाजी पाटील अडवण्यासाठी गेले असता किरण शेळके यांनी त्यांच्या हातातील तलवारीने संभाजी पाटील यांच्या डोक्यात मारून जखमी केले. कौशल्या यांनी खांद्यावर कुदळीने मारहाण केली, तर तानाजी पाटील यांना अनोळखी लोकांनी जबरदस्तीने दारू पाजून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कल्पना पाटील यांना अंकुश चोरमुले व रवींद्र चोरमुले यांनी काठ्या व कुदळीच्या दांड्याने, तर शुभांगी व राजाक्का पाटील यांना ज्योती चोरमुले, रवींद्र चोरमुले यांनी काठीने आणि वर्षा पाटील यांना जालिंदर यांच्या पत्नी व बहिणीने काठीने मारहाण केली.
सोबत असलेल्या लोकांनी शिवीगाळ करून पुन्हा रस्त्याने गेल्यास पेटवून देण्याची धमकी दिली. या मारहाणीत संभाजी पाटील, तानाजी पाटील, शुभांगी पाटील, कल्पना पाटील, राजाक्का पाटील गंभीर जखमी झाल्या. वर्षा पाटील यांनी आष्टा पोलिसांत फिर्याद दिली आहे. घटनास्थळी इस्लामपूरचे उपविभागीय अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी रात्री नऊच्या सुमारास भेट देऊन माहिती घेतली.